जळगाव : चोरीच्या दोन मोबाईलसह मोबाईल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखा आणि पाळधी दुरक्षेत्र यांच्या संयुक्त तपास पथकाने अटक केली असून त्यास न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मनोज प्रकाश कोळी (रा. खेडी कढोली तालुका एरंडोल) असे या मोबाईल चोरट्याचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून चोरीचे दोन मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे.
दिनांक 22 सप्टेंबर 2024 रोजी बांभोरी नजीक हिताची कंपनी समोर सकाळी पाच वाजेच्या सुमारास ही मोबाईल चोरीची घटना घडली होती. दीपक शशिकांत पाटील आणि त्याचा मित्र प्रणव मेटकर अशा दोघांचे मोबाईल चोरी झाल्या प्रकरणी पाळधी दुरक्षेत्र येथे हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गु. र.न. 344/24 बीएनएस 2023 चे कलम 303(2) नुसार दाखल या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक फौजदार सुनील लोहार यांच्याकडे देण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा समांतर तपास धरणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पवन देसले, पाळधी दुरक्षेत्रचे सपोनि प्रशांत कंडारे, स्थानिक गुन्हे शाखेचे हे.कॉ. जितेंद्र पाटील, दीपक माळी, रविंद्र पाटील तसेच सहाय्यक फौजदार सुनील लोहार, पोलीस अंमलदार जितेश नाईक, ज्ञानेश्वर बाविस्कर, रमेश सूर्यवंशी आदी करत होते. सीसीटीव्ही फुटेज, गुप्त बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे एरंडोल तालुक्यातील खेडी कढोली येथील रहिवासी मनोज प्रकाश कोळी यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्या ताब्यातून 28 हजार रुपये किमतीचे चोरीचे दोन मोबाईल हस्तगत करण्यात आले. त्यास न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यास न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.