अंगावरील दागिने काढून दिले पडून व्याजाच्या मोहात – सुवर्णाताई नवाल यांचा खून झाला हातोड्याच्या घावात

जळगाव (क्राईम दुनिया न्यूज नेटवर्क): जळगाव शहरातील पंचमुखी हनुमान मंदीरानजीक रणछोड नगर परिसरात राजेश दामोदर नवाल आणि सुवर्णा नवाल हे दोघे पती पत्नी रहात होते. इश्वर कृपेने सुखी संपन्न परिवाराचे धनी असलेले राजेश नवाल यांचे जळगाव शहरातील सुभाष चौकात “यश ट्रेडर्स” हे धान्य विक्रीचे दुकान आहे. राजेश आणि सुवर्णा नवाल या दाम्पत्यास दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार लाभला होता. त्यांची मोठी विवाहीत मुलगी तिच्या परिवारासह पालघर जिल्ह्यातील वसई येथे राहते. दुसरी मुलगी दुबई येथे आर्किटेक्ट आणि मुलगा पुणे येथे आयटी इंजीनिअर म्हणून नोकरीला आहे. एकंदरीत नवाल दाम्पत्याचे इश्वरकृपेने सर्वकाही सुरळीत सुरु होते.

असे म्हणतात की मनुष्य ज्यावेळी प्रगतीपथावर वाटचाल करत असतो त्यावेळी त्याच्या हातून एखादी घोडचुक होण्याची दाट शक्यता असते. नेमक्या याच प्रगतीच्या कालावधीतच मनुष्य एखादी घोडचुक करतो आणि त्याचे परिणाम त्याला अथवा त्याच्या परिवाराला जीवनभर भोगावे लागतात. असाच काहीसा प्रकार सौ. सुवर्णा नवाल यांच्या बाबतीत घडण्यास सुरुवात झाली. घरात सर्वकाही सुरळीत सुरु असतांना सुवर्णा नवाल यांना व्याजाने पैसे देण्याचा आणि भिशी चालवण्याचा मोह झाला. याचा परिणाम म्हणून पैशांची गरज असलेल्या परिचीतांमधे हा संदेश जाण्यास वेळ लागला नाही. आजकाल प्रत्येकाला प्रापंचीक अडचणी सोडवण्यासाठी पैशांची गरज भासते. त्यासाठी अनेक जण व्याजाने पैसे घेण्यास तयार असतात.

सुवर्णाताई या नावाने परिचीत असलेल्या सुवर्णा नवाल या व्याजाने पैसे देतात आणि भिशी चालवतात हा संदेश संबंधितांमधे गेला. त्या माध्यमातून सरला धर्मेंद्र चव्हाण ही शिव कॉलनी परिसरात राहणारी महिला सुवर्णा नवाल यांच्या संपर्कात आली. बघता बघता सरलाने सुवर्णाताई यांचा चांगल्या प्रकारे विश्वास संपादन केला. सरला चव्हाण ही सुवर्णा नवाल यांची एकप्रकारे मध्यस्थ म्हणून काम बघू लागली. गरजूंना सुवर्णा नवाल यांच्यासमोर आणून त्यांना व्याजाने पैसे मिळवून देण्याचे काम सरला बघू लागली. त्यातून सुवर्णाताई नवाल यांचा सरलावरील विश्वास अजून घट्ट झाला.

वंदना लालबाबू पासवान नावाची मजुरीने कामाला जाणारी महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना कर्ज मिळवून देण्याचे काम करत होती. बचत  गटाच्या माध्यमातून एके दिवशी सरला आणि वंदना या दोन्ही महिला एकमेकींच्या संपर्कात आल्या. सरला हिस कमी व्याजदराने कर्जाची गरज भासली. त्यावेळी सरलाने वंदनाला कर्ज मिळवून देण्याची विनंती केली. वंदना हिने सरला चव्हाण हिस बचत गटात सहभागी करुन घेत कर्ज मिळवून दिले. त्या माध्यमातून वंदना आणि सरला या दोघींची चांगली ओळख निर्माण झाली.

राजेंद्र उर्फ आप्पा रामदास पाटील हा म्हसावद येथील रहिवासी सरलाच्या ओळखीचा होता. तो राजू आप्पा या नावाने म्हसावद या गावातील लोकांना परिचीत होता. त्याला वाळू वाहतुकीसाठी डंपर घ्यायचे होते. डंपर घेण्यासाठी त्याला पाच लाख रुपयांची गरज होती. त्यासाठी तो कर्ज मिळवण्याच्या प्रयत्नात होता. त्याने सरलाकडे आपली समस्या मांडली. त्यामुळे सरलाने राजु आप्पासाठी कर्ज मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले.

oppo_0

सरलाने राजु आप्पाची वंदनासोबत ओळख करुन दिली. ओळख परिचय झाल्यानंतर सरलाने वंदनाला म्हटले की राजु आप्पा यास डंपर घेण्यासाठी पाच लाख रुपयांची गरज आहे. त्यासाठी त्याला कर्ज हवे आहे. तु तुझ्या ओळखीच्या कुणाकडून तरी पाच लाख रुपयांचे आप्पाला कर्ज मिळवून दे. सरलाचा परिचीत असलेल्या राजु आप्पासाठी पाच लाख रुपयांचे कर्ज मिळवण्यासाठी वंदनाने प्रयत्न केले. मात्र त्यात तिला यश आले नाही. त्यामुळे सरलानेच या कामी पुढाकार घेतला.

सौ. सुवर्णा नवाल या आपल्याला पाच लाख रुपयांची मदत करु शकतात हा विचार सरलाच्या मनात चमकून गेला. दुस-यासाठी मदत मागणे सोपे असते मात्र स्वत:साठी मदत मागणे कठीण असते हा विचार देखील सरलाच्या मनात आला. पाच लाख रुपयांची खरी गरज राजु आप्पाला होती आणि त्यासाठी सरला पुढाकार घेत होती. त्यासाठी तिने वंदनाला पुढे केले. वंदनाने सुवर्णाताई नवाल यांना आपली व्यक्तीगत अडचण सांगून स्वत:च्या नावे पैसे मागावे आणि मिळालेले पैसे नंतर स्वत: ताब्यात घेऊन ते राजु आप्पाला द्यावे असा प्लान सरलाने तयार केला. त्यानुसार सुवर्णा नवाल यांच्याकडे बुधवार दि. 26 जून 2024 रोजी जाण्याचे निश्चित झाले.   

बुधवार दिनांक 26 जून 2024 रोजी वंदना आणि सरला या दोघी जणी सुवर्णाताई नवाल यांच्याकडे गेल्या. अगोदरच ठरल्यानुसार वंदनाने आपली खोटी खोटी अडचण सुवर्णा नवाल यांना सांगत पाच लाख रुपयांची मागणी केली. यावेळी सुत्रधार सरला ही मध्यस्थ असल्याचे बघून सुवर्णाताई यांनी व्याजाच्या मोहात पडून गळ्यातील मंगळपोत काढून दोघींच्या ताब्यात दिली. ही मंगलपोत तुम्ही गहाण ठेवा आणि मला दिवाळीपुर्वी व्याजासह परत आणून द्या असे सांगितले.  

सुवर्णाताई यांनी स्वत:च्या गळ्यातून काढून दिलेली सोन्याची पोत हाती पडल्यानंतर ती गहाण ठेवून पैसे घेण्यासाठी दोघी जणी तातडीने सराफ बाजारात गेल्या. सराफ व्यावसायीकाने त्या सोन्याच्या मंगलपोतीला गहाण ठेवून घेत केवळ 3 लाख रुपये त्यांना दिले. त्या पोतीच्या ठेवीची पावती सरलाच्या नावे करण्यात आली. सरलाने तिन लाख रुपयांची रक्कम राजु आप्पाला देण्यासाठी आपल्या ताब्यात घेतली. पुर्ण पाच लाख रुपये जमा होण्यास दोन लाख रुपये कमी पडत होते. त्यामुळे दोन्ही जणी 2 जुलै रोजी पुन्हा सुवर्णाताईंकडे पैसे मागण्यासाठी गेल्या.

यावेळी सुवर्णाताईने त्यांच्या घरातील सोन्याच्या चार लहान अंगठ्या, सोन्याचे कानातील झुमक्यांचे जोड काढून दिले. मात्र सर्व दागिने मला दिवाळीपुर्वी न चुकता व्याजासह आणून द्यावे असे सुवर्णाताईंनी दोघींना बजावले. यावेळी दोघी जणी पुन्हा सराफाकडे गेल्या. यावेळी त्यांना या गहान वस्तूंचे सराफाने 75 हजार दिले. यावेळी वस्तूंच्या गहाण ठेवीची पावती वंदनाच्या नावे करण्यात आली. दरम्यानच्या कालावधीत ओळखीचा फायदा घेत वंदनाचा पती लालबाबू यादव याने देखील सुवर्णाताईंकडून रोख 60 हजार रुपये व्याजाने घेतले.

बघता बघता दिवाळीचा सण जवळ आला. ठरल्यानुसार सुवर्णाताई नवाल यांना दिवाळी सणानिमित्त पुजेसाठी त्यांचे स्त्रीधनाचे दागिने हवे होते. त्यासाठी त्या वारंवार सरला आणि वंदना या दोघींना मोबाईलद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न करु लागल्या. दरम्यानच्या कालावधीत वंदनाचा पती  लालबाबू याने देखील सुवर्णाताई नवाल यांच्याकडून ओळखीचा गैरफायदा घेत व्याजाने 60 हजार रुपये रोख नेले होते. तो ते पैसे देखील त्यांना परत करत नव्हता. त्यामुळे सुवर्णाताई मोबाईलच्या माध्यमातून त्याच्याशी देखील वारंवार संपर्क साधत होत्या. माझ्या दागिन्यांबाबत माझे पती मला दिवाळीच्या वेळी विचारणा करतील. त्यापुर्वी तुम्ही मला  दागिने आणून द्या अशी आर्त विनवणी सुवर्णाताई दोघी जणींना करत होत्या. मात्र अद्यापपावेतो त्यांना ना मुद्दल मिळाली, ना व्याज मिळाले ना त्यांचे गहाण ठेवलेले दागिने मिळाले. त्यामुळे त्या हैरान झाल्या. सुवर्णाताईंच्या रोजच्या तगाद्याला सरला चव्हाण, राजेंद्र उर्फ राजुआप्पा  रामदास पाटील आणि लालबाबू रामनाथ पासवान हे तिघे वैतागले होते.

आपण सुवर्णाताईंना जीवानिशी ठार केले तर आपल्याला त्यांचे पैसे द्यावे लागणार नाही आणि आपली त्यांच्या तगाद्यातून कायमची सुटका होईल असा कुविचार सरला चव्हाण, सरलाचा मित्र राजुआप्पा आणि वंदनाचा पती लालबाबू पासवान या तिघांच्या मनात आला. पैसे परत  करण्याच्या बहाण्याने सुवर्णाताईंच्या घरी जावून त्यांचा कायमचा नायनाट करण्याचा तिघांनी बेत आखला. सुवर्णाताईंचे पती राजेश दामोदर नवाल हे सकाळी साडेदहा वाजता दुकानात जातात आणि दुपारी अडीच वाजेच्या सुमारास जेवण करण्यासाठी घरी  येतात हे तिघांना ठाऊक होते. दुपारी साडेतीन ते पावणेचार वाजेच्या सुमारास विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा दुकानावर जातात हा नित्यक्रम देखील तिघांनी माहित केला होता.

10 ऑक्टोबर 2024 हा सुवर्णाताई नवाल यांच्या जीवनातील अखेरचा दिवस उजाडला. या दिवशी अतिशय निघृणपणे त्यांची हत्या होणार असल्याचे नियतीच्या मनात होते. या दिवशी नेहमीप्रमाणे सुवर्णाताई नवाल यांचे पती राजेश नवाल हे सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास सुभाष चौकातील त्यांच्या दुकानावर गेले. दुपारी सव्वा दोन  वाजेच्या सुमारास ते जेवण करण्यासाठी घरी आले. या दिवशी त्यांचा पुणे येथे नोकरीनिमीत्त राहणारा मुलगा यश घरी येणार होता. दुपारी त्यांचे पत्नी सुवर्णाताई यांच्यासोबत बोलणे झाले ते शेवटचेच. पत्नीच्या हातून वाढलेले जेवण आणि सोबत बसून केलेल्या गप्पाटप्पा देखील अखेरच्या ठरल्या. थोडा वेळ आराम करुन साडेतीन वाजता राजेश नवाल दुकानावर गेले.

त्यानंतर सायंकाळी पैसे परत करण्याच्या बहाण्याने राजुआप्पा पाटील, सरला चव्हाण आणि लालबाबू पासवान असे तिघेजण सुवर्णाताई नवाल यांच्या घरी गेले. त्यावेळी सुवर्णाताई नवाल या घरी एकट्याच होत्या. कापडात गुंडाळून आणलेल्या लोखंडी हातोड्याने आप्पा पाटील याने सुवर्णाताई नवाल यांच्या डोक्यावर जोरदार हल्ला केला. अचानक झालेल्या या जीवघेण्या हल्ल्यात सुवर्णाताई फरशीवर कोसळल्या. त्यांचे डोके फुटून त्यातून रक्त वाहू लागले. त्याचवेळी लालबाबू पासवान याने देखील सुवर्णाताई नवाल यांच्या डोक्यावर त्याच हातोड्याने दोन वेळा हल्ला केला. दुस-यांदा झालेल्या हल्ल्याने सुवर्णाताई नवाल यांची हालचाल बंद झाली. 10 ऑक्टोबरची रात्र बघणे त्यांच्या नशीबी नव्हते. त्यानंतर सरला व आप्पा पाटील हे दोघेजण मोटार सायकलने पसार झाले. लालबाबू देखील तेथून निघून गेला. या खूनी हल्ल्यात वापरलेला कापडात गुंडाळलेला लोखंडी हातोडा आप्पा पाटील याने लालबाबू यास कुठेतरी फेकून देण्यास सांगितले होते. तो लोखंडी हातोडा लालबाबू याने नर्सरीनजीक असलेल्या नाल्याच्या बाजूला लपवून ठेवला आणि त्यावरील कापड नाल्यात फेकून दिला.   

त्यानंतर मयत सुवर्णा नवाल यांचे पती राजेश नवाल यांनी रात्री सव्वा आठ  वाजेनंतर नेहमीप्रमाणे दुकान बंद केले. नवी पेठ परिसरातील सारस्वत बॅकेच्या एटीएममधे पैसे जमा करुन त्यांनी नेरी नाका परिसरात राहणा-या बहिणीकडून त्यांचे प्रेस केलेले कपडे ताब्यात घेतले. त्यानंतर पांडे चौकातून दुधाची पिशवी विकत घेतली. त्यानंतर रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास त्यांनी घर गाठले.

यावेळी त्यांच्या घराचा दरवाजा लोटलेला होता. घरातील हॉल व बेडरुमचा लाईट सुरु असल्याचे त्यांनी पाहिले. हॉलमधे त्यांना पत्नी सुवर्णा यांचे पाय दिसले. कदाचीत पत्नी व्यायाम करत असेल असा त्यांनी मनाशी समज केला. हातातील दुधाची पिशवी आणि प्रेसचे कपडे त्यांनी खुर्चीवर ठेवले. त्यानंतर त्यांनी पत्नीकडे निरखून पाहिले असता त्यांच्या पायाखालची जणूकाही वाळूच सरकली. त्यांना जणूकाही अचानक शॉक बसला. त्यांना त्यांच्या डोळ्यावर विश्वासच बसत  नव्हता. त्यांच्या मुखातून शब्द फुटेनासा झाला.

पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडली असल्याचे चित्र त्यांना दिसून आले. तिला हलवून पाहिले असता ती कोणतीही हालचाल करत नव्हती. घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी शेजारी राहणा-या  भावाच्या पत्नीला बोलावले. त्यांच्या भावाची पत्नी देखील घटनास्थळावरील भयावह चित्र बघून काहीवेळ भयभीत झाली. स्वत:ला  सांभाळत राजेश नवाल यांनी त्यांचे परिचीत असलेले डॉ. सारंग जोशी व पोलीसांना फोन केला. काही वेळाने त्यांच्या घरी डॉक्टर आले. डॉ. सारंग जोशी यांनी सुवर्णा नवाल यांची तपासणी केली असता त्या मयत झाल्या असल्याचे त्यांनी सर्वांना सांगितले.

या घटनेची माहीती एमआयडीसी पोलिस स्टेशनला समजल्यानंतर पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वप्रथम सहायक पोलिस निरीक्षक अनिल वाघ व त्यांच्या सहका-यांनी घटनास्थळ गाठले. मयत सुवर्णा नवाल यांचे पती राजेश नवाल यांनी दिलेल्या फिर्यादींनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला अज्ञात मारेक-यांविरुद्ध खूनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. गु.र.नं. 718/24 भारतीय न्याय संहिता 103 (1) नुसार दाखल गुन्ह्याचा पुढील तपास एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पो.नि. दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. अनिल वाघ यांच्याकडे  देण्यात आला. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला.  

या गुन्ह्याच्या तपासादरम्यान मयत सुवर्णा नवाल यांचे मोबाईल कॉल रेकॉर्ड तपासण्यात आले. घटनेच्या दिवशी दिवसभरात एकाच क्रमांकावर सारखे सारखे कॉल झाल्याचे पोलिसांना आढळून आले. याशिवाय घटनास्थळ परिसरातील सिसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले तसेच गुप्त बातमीदारांची देखील मदत  घेण्यात आली.

मोबाईल कॉल तपशील, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारांनी दिलेली माहिती या सर्वांचा मेळ बसवत क्रमाक्रमाने लालबाबू रामनाथ पासवान, राजेंद्र उर्फ आप्पा रामदास पाटील आणि सरला धर्मेंद्र चव्हाण या तिघांना चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले. तिघांना वेगवेगळ्या पद्धतीने आणि एकत्रीतपणे बोलावून चौकशी करण्यात आली. पोलिसी खाक्या बघून तिघांनी अखेरीस आपला गुन्हा कबुल केला. मयत सुवर्णा नवाल या व्याजाने पैसे देत होत्या. त्या भिशी देखील चालवत होत्या असे समजते. त्यांनी अंगावरील दागिने वंदना पासवान, सरला चव्हाण यांना दिले होते. ते दागिने गहाण ठेवून या दोघींनी व्याजाने पैसे घेतले होते. दिवाळीपुर्वी व्याजासह दागिने परत आणून देण्याच्या बोलीवर हा व्यवहार झाला होता. वंदना पासवान हिचा पती लालबाबू पासवान याने देखील रोख 60 हजार रुपये सुवर्णा नवाल यांच्याकडून व्याजाने घेतले होते. दिवाळी जवळ आल्याने सौ. नवाल या दोघींना व्याजासह दागिने आणि लालबाबू यास व्याजासह पैसे मागत होत्या. त्यांच्या नेहमीच्या तगाद्याला सर्वजण वैतागले होते. त्यांची दागिने व पैसे व्याजसह परत  देण्याची तयारी नव्हती. सुवर्णा नवाल यांना जीवानिशी संपवल्यास आपली व्याजासह पैसे, दागिने देण्यापासून कायमची सुटका होईल या उद्देशाने त्यांचा लोखंडी हातोड्याने डोक्यावर हल्ला करुन खून  करण्यात आला. मात्र तांत्रीक विश्लेषण, गुप्त बातमीदार यांच्या बळावर हा गुन्हा कमी  वेळात उघडकीस आला.

जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधिक्षक संदीप गावीत, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. बबन आव्हाड, स.पो.नि. दत्तात्रय पोटे, सहायक फौजदार अतुल वंजारी, संजय हिवरकर, हे.कॉ. अक्रम शेख, विशाल महाजन, पोलिस नाईक राहुल पाटील, पो.कॉ. प्रविण भालेराव, इश्वर पाटील, एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पो.नि. दत्तात्रय निकम, सहायक पोलिस निरीक्षक अनिल वाघ, पोलिस उप निरीक्षक शरद  बागल, हे.कॉ. रतन गिते आदींनी या तपासकामी सहभाग घेतला.     

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here