जळगाव : जैन इरिगेशनच्या सहकार्याने सालाबादप्रमाणे जळगाव शहरातील काव्यरत्नावली चौकात दीपोत्सवाचे अर्थात दीपावली पर्वाचे महत्व सांगणारी आरास लावण्यात आली आहे. या आरासमधे दीपावलीच्या प्रत्येक पर्वाचे महत्व आणि माहिती सादर करण्यात आली आहे. सामाजिक जाणिवेतून प्रत्येक समाज कार्यात जैन इरिगेशनचा कायम पुढाकार असतो. जळगाव शहराचा मध्यवर्ती भाग समजल्या जाणा-या काव्यरत्नावली चौकात दररोज सायंकाळी विरंगुळा म्हणून बाळगोपाळांपासून जेष्ठ नागरिक एकत्र येतात. या पार्श्वभुमीवर जैन इरिगेशनच्या माध्यमातून दरवर्षी दीपावली अर्थात दीपोत्सवाची माहिती विषद करणारी आरास केली जाते. त्या माध्यमातून दीपावली पर्वाची सर्वांना माहिती होते.
दिवाळी, ज्याला आपण दीपावली असेही म्हणतो, हा भारतातील सर्वात महत्त्वाचा आणि आनंददायी हर्ष उल्हासाचा सण आहे. तो प्रकाशाचा सण म्हणून देखील ओळखला जातो. अंधारावर प्रकाशाचा, अज्ञानावर ज्ञानाचा आणि वाईटावर चांगल्याचा विजय हा सण दर्शवतो. दिवाळी हा सण, हिंदू धर्मात अतिशय खोलवर रुजलेला सण आहे. या सणाशी संबंधित सर्वात प्रसिद्ध कथा समजली जाते ती म्हणजे प्रभू श्री रामचंद्र यांनी रावणावर मिळवलेला विजय. हा विजय मिळवल्यानंतर आणि 14 वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येत परतल्यानंतरची पार्श्वभूमी या सणाला आहे.
या दिवशी प्रभू श्रीराम, पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासह चौदा वर्षाचा वनवास संपवून अयोध्येला परतले होते. अयोध्येतील लोकांनी त्या काळी प्रभू श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण यांच्या स्वागतासाठी संपूर्ण आयोध्या नगरीच्या रस्त्यांवर आणि त्यांच्या घरांमध्ये तेलाचे दिवे लावले होते. तेव्हापासून दिवाळी सणाला मोठ्या प्रमाणात दिवे लावण्याची परंपरा सुरु झाली. दिवाळीशी संबंधित आणखी एक महत्त्वाची कथा म्हणजे भगवान श्रीकृष्णाने नरकासुर राक्षसावर विजय मिळवल्याची आहे. हा विजय नरक चतुर्दशी म्हणून देखील साजरा केला जातो, हा सण दिवाळीच्या एक दिवस अगोदर येतो. दिवाळी ही लक्ष्मीपूजनाची रात्र असते, या रात्री श्री लक्ष्मी देवी, संपत्ती आणि समृद्धीच्या देवीची पूजाअर्चा केली जाते.
दिवाळीची सुरुवात घरांची साफसफाई करुन केली जाते. लोक आपली घरे, वाहने स्वच्छ करतात. स्वच्छ घरात नेहमी देवी लक्ष्मी येते. घरांच्या प्रवेशद्वारावर रांगोळ्या काढल्या जातात. दिवाळीच्या मुख्य दिवशी सायंकाळी लक्ष्मीपूजन केले जाते. लक्ष्मी आणि गणपतीच्या मूर्त्यांना फुलांनी सजवून त्यांची पूजा केली जाते. लक्ष्मीपूजनाच्या वेळी संपूर्ण घरात दीप प्रज्वलन केले जाते. घराच्या प्रत्येक कोपऱ्यात प्रकाश पसरवून सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी येते असा आपल्या सर्वांचा विश्वास आहे.
दिवाळीच्या निमित्ताने घराघरात विविध प्रकारच्या मिठाई आणि फराळ देखील तयार केले जातात. लाडू, करंजी, चकली, शंकरपाळे, मिठाईचे पदार्थ या सणाचे मुख्य आकर्षण आहेत. लोक एकमेकांना मिठाई वाटून दीपावली सणाच्या आनंदात सहभागी होतात. या सणाच्या निमित्ताने लोक आपले भेदभाव, मतभेद विसरून एकत्र येतात आणि एकमेकांशी स्नेहभाव वाढवतात.