नवी दिल्ली : भारतीय रेल्वेकडून देशात सध्या 230 रेल्वे गाड्या चालवल्या जात आहेत. 12 सप्टेंबरपासून 80 नव्या विशेष रेल्वेगाड्या सुरु होणार असून 10 सप्टेंबरपासून रिझर्वेशनला सुरुवात होत आहे. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही.के. यादव यांनी आज जाहीर केले. 80 नव्या रेल्वेगाड्या अथवा 40 जोडी रेल्वे 12 सप्टेंबरपासून सुरु होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
याबाबत अधिसूचनाही जारी केली जाणार आहे. नव्या रेल्वेची गरज भासेल त्याठिकाणी अथवा जेथे मोठी वेटिंग लिस्ट असेल तेथे अॅक्चूअल रेल्वेपूर्वी एक क्लोन रेल्वेगाडी चालवली जाईल. याशिवाय परीक्षांसाठी अथवा एखाद्या कारणासाठी राज्य सरकारच्या मागणीनुसार रेल्वेगाड्या चालवल्या जातील.
कोरोनाचा परिणाम काही निविदा व भूमी अधिग्रहणाच्या प्रक्रियेवर झाला असला तरी बुलेट ट्रेन योजना योग्य प्रकारे सुरु असल्याचे यादव यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, रेल्वे रुळांच्या बाजूला असलेला कचरा दिल्ली सरकार व रेल्वेकडून संयुक्तपणे साफ केला जात आहे. लॉक डाउन काळात रेल्वे बोर्डाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अहवालानुसार लॉकडाउनमुळे एकट्या पश्चिम रेल्वेचे 1,837 कोटी रुपयांपेक्षाही जास्त प्रमाणात नुकसान झाले आहे.