जळगाव : व्यावसायीक स्पर्धेतून ट्रान्सपोर्ट व्यावसायीकाचा ट्र्क फटाक्यांच्या मदतीने जाळण्याचा प्रयत्न उघडकीस आला. या घटनेप्रकरणी भुसावळ येथील एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शुक्रवार 8 नोव्हेंबरच्या पहाटे ट्रकमधून जाळ येत असल्याचे बघून हा टाईमबॉंब असल्याची अफवा घटनास्थळी पसरली होती. फटाके, बाटल्या, कापूस ठेवून तयार करण्यात आलेला बॉक्स ‘शोभेचे फटाके प्रज्वलित करण्याच्या इग्नेशन डिव्हाइसने पेटवून देत ट्रकसह त्यातील साहित्य जाळण्याचा हा प्रयत्न समोर आला आहे.
सलीम खान बशीर खान हे शिवाजी नगर परिसरातील रहिवासी असून ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आहेत. 7 नोव्हेंबरच्या रात्री जळगाव शहरातील आर. आर. विद्यालयानजीक एकाने त्यांना दोन बॉक्स आणून दिले. ते बॉक्स औषधीचे असून चाळीसगाव व भडगाव येथे पोहोच करायचे असल्याचे त्यांना सांगण्यात आले. प्रत्यक्षात त्यात फटाके, बाटल्या व कापूस ठेवून तयार करण्यात आलेला बॉक्स होता. शोभेचे फटाके प्रज्वलीत करण्याचा इग्नेशन डीव्हाइसने पेटणारा तो बॉक्स होता.
शुक्रवारी पहाटे पाच वाजता ट्रक मालक सलीम खान ट्रकजवळ आले असता, त्यांना ट्रकमधून धूर निघतांना दिसला. तरुणाने आणून दिलेल्या बॉक्सलाच आग लागली असल्याचे त्यांना दिसून आले. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांनी आपल्या सहका-यांसह घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी ट्रकमालक सलीम खान यांच्याकडून माहिती समजून घेतली. त्यात त्यांना समजले की ट्रक मालक सलीम खान हे सुमारे बारा वर्षापुर्वी ट्रान्सपोर्ट व्यावसायीक जितेंद्र राणे यांच्याकडे कामाला होते. त्यानंतर त्यांनी स्वत:चा वाहतूक व्यवसाय सुरु केला.
व्यावसायिक स्पर्धेतून हा प्रकार असल्याचा संशय सलीम खान यंनी व्यक्त केला. त्यानुसार भुसावळ येथून जितेंद्र राणे यांचा मुलगा धिरज राणे यास ताब्यात घेतले असता त्याने आपला गुन्हा कबुल केला. आगग्रस्त ट्रकमध्ये सुमारे पन्नास लाख रुपयांची औषधी होती. त्यापैकी सुमारे पाच लाख रुपयांची औषधी जळाली. सलीम खान यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार धिरज राणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे.