एक लाखाची उधारी, त्यात दोघांचा वाद भारी —– कुणालने सुपडूबाबाला पाठवले मृत्यूच्या दारी

जळगाव (क्राईम दुनिया न्यूज नेटवर्क): भगत, बुवाबाजी, करणी या गोष्टींना शास्त्रात आणि कायद्यात कोणतेही स्थान नाही. तरीदेखील ग्रामीण भागातील अज्ञानी लोक भगताकडे जावून त्याच्याकडे आपली “दर्दभरी दास्तान” कथन करतात. स्वत:च्या समस्या सोडवू न शकणारा भगत मात्र अज्ञानी लोकांना त्यांच्या समस्या सोडवण्याचे मार्गदर्शन करत असतो. बुवाबाजीतून चांगल्या प्रकारे पैसा हातात खेळू लागल्याने भडगाव येथील एका भगताने गावातील लोकांना व्याजाने पैसे देण्याचे काम सुरु केले. मात्र एका व्यवहारात या वयोवृद्ध भगताची फसवणूक झाली आणि तरुणाच्या हातून धारदार शस्त्राने त्याचा खून झाला.

जळगाव जिल्ह्यातील भडगाव या तालुक्याच्या ठिकाणी सुपडू  नाना पाटील हे 78 वर्षाचे वयोवृद्ध भगत रहात होते. भगत बाबा म्हणून ओळख असलेल्या सुपडू पाटील यांचा शेती हा व्यवसाय होता. सुपडू पाटील हे भगत म्हणून गावातील लोकांना परिचीत होते. अंगात येणे, करणी करणे, समस्येचे समाधान करणे, समस्येवर तोडगा सांगणे आदी कामे सुपडू पाटील करत होते. भेटण्यासाठी आलेल्या लोकांना त्यांच्या समस्यांचे समाधान सांगून निराकरण करण्याचे काम सुपडू पाटील करत होते. त्यामुळे त्यांची भेट घेणा-यांची त्यांच्या घरी नेहमी गर्दी रहात होती. या कामातून त्यांच्याकडे चांगला पैसा जमला होता. त्यामुळे ते गावातील लोकांना व्याजाने पैसे देखील देत होते. पत्नी, दोन मुले, सुना आणि नातवंडे असा त्यांचा परिवार होता.

सुपडू पाटील भगत असल्यामुळे त्यांची गावात चांगल्याप्रकारे ओळख होती. भडगाव येथील पेठ भागात राहणारा कुणाल चुडामण मराठे हा सुपडू पाटील यांच्या परिचयातील तरुण होता. कुणाल मराठे याच्याकडे दोन ट्रॅक्टर होते. वाळू वाहतुकीसाठी त्याने ट्रॅक्टर जुंपले होते. वाळू वाहतुकदार कुणाल मराठे हा देखील इतर लोकांप्रमाणे भगत सुपडू पाटील यांच्याकडे नेहमी येत असे. सुपडू पाटील आणि कुणाल मराठे हे दोघे एकमेकांना चांगल्याप्रकारे परिचीत होते. त्यामुळे या ओळखीतून कुणाल याने सुपडू पाटील यांना एक लाख रुपये उधार मागितले होते. वाळू वाहतुकदार असल्यामुळे कुणालच्या हातात पैसा खेळता असतो, त्याचे पैसे कुठे जाणार नाही असा मनाशी समज करुन सुपडू पाटील यांनी कुणाल मराठे याला एक लाख रुपये उधार दिले.

बघता बघता एक महिना उलटून गेला. दिवसामागून दिवस जात होते. मात्र कुणाल काही केल्या सुपडू पाटील यांना त्यांचे एक लाख रुपये देत नव्हता. त्यामुळे भगत असलेले सुपडू पाटील कुणालवर चिडचिड करु लागले. कुणाल जिथे भेटेल तिथे ते त्याला अद्वातद्वा बोलू लागले. चारचौघात सुपडू पाटील यांच्याकडून आपल्या इज्जतीचा लिलाव होत असल्याचे बघून कुणाल देखील त्यांच्यवर चिड चिड करु लागला. दोघे एकमेकांवर चिडचिड करत होते. मात्र कुणाल काही केल्या सुपडू पाटील यांना  त्यांचे एक लाख रुपये देत नव्हता. आज देतो उद्या देतो असे म्हणत कुणालकडून चालढकल सुरु होती. त्याची चालढकल सुपडू पाटील यांना सहन होत नव्हती. त्यामुळे ते त्याला शिवीगाळ करत होते. दरम्यानच्या काळात कुणाल मराठे याचे दोन्ही ट्रॅक्टर पोलिस कारवाईत पकडले गेले. त्याच्या घरात देखील सुख शांती नव्हती. सुपडू पाटील यांनी करणी केल्यामुळेच आपले ट्रॅक्टर पकडले गेले आणि आपल्या घरातील  शांतता नाहिशी झाली असा कुणालने मनाशी समज करुन घेतला.

मयत सुपडू पाटील

आता सुपडू पाटील यांचा काहीतरी बंदोबस्त केलाच पाहीजे असा कुणालने मनाशी निश्चय केला. त्यासाठी त्याने नियोजन सुरु केले. इकडे कुणालच्या मनात सुपडू पाटील यांना कायमचे संपवण्याचा विचार सुरु होता. तिकडे सुपडू पाटील हे कुणाल यास शिवीगाळ करतच होते. वास्तविक कुणालने भगत बाबा सुपडू पाटील यांचे उधार घेतलेले एक लाख रुपये देऊन टाकायला हवे होते. मात्र तसे होत नसल्यामुळेच हा प्रकार घडत होता.

भडगाव येथेच रोहीत दिलीप मराठे हा तरुण रहात होता. रोहीत हा नात्याने कुणालचा मामेभाऊ होता. रोहीतच्या चुलत आत्याचा मुलगा कुणाल हा रोहीतचा आते भाऊ होता. दोघे एकमेकांचे आतेभाऊ आणि मामेभाऊ होते. 7 मे 2024 रोजी रोहीत हा घरी एकटाच होता. त्याचे आई वडील बाहेरगावी गेले होते. त्यामुळे एकटा असलेल्या रोहीतने त्याचे काका प्रशांत मराठे यांच्याकडे रात्रीचे जेवण आटोपून तो गावात पेठ चौफुली भागात त्याच्या मित्रांसोबत गप्पा करत बसला होता. त्याचवेळी घाईघाईने मोटार सायकलवर त्याचा आतेभाऊ कुणाल त्याच्याजवळ आला. कुणालने रोहीतला एका बाजूला बोलावून घेतले.

एका बाजूला एकांतात बोलावून कुणालने रोहीतला हळूच सांगितले की मी सुपडू बाबाला फोन करुन त्याचे उधारीचे पैसे देण्याचा बहाणा करुन रस्त्यावर बोलावून घेतले आहे. कुणाल आणि सुपडू बाबा यांच्यातील उधारीचा वाद रोहीतला चांगल्याप्रकारे माहिती होता. आज रात्री त्याचे काम करायचे आहे असे कुणालने रोहीतला पुढे बोलतांना सांगितले आणि त्याला पटकन गाडीवर डबलसिट बसण्यास सांगितले.

कुणालने सांगितल्यानंतर रोहीत पटकन त्याच्या ताब्यातील मोटार सायकलवर डबलसिट बसला. रोहीत सिटवर बसताच कुणालने गाडी रेस करत पुढे हाकली. वाटेत एरंडोल रस्त्याने कमानीच्या पुढे उधारीचे पैसे मिळण्याच्या खुळ्या आशेने सुपडू बाबा एकटाच उभा होता. आजची रात्र आपल्या जीवनातील अखेरची रात्र असल्याचे त्याला माहितीच नव्हते. उद्या 8 मे 2024 ची सकाळ बघणे आपल्या नशीबी नाही हे सुपडू बाबाला ठाऊक नव्हते.   

भगत सुपडू बाबा दिसताच कुणालने त्यांच्या जवळ गाडी उभी केली. कुणालने भगत बाबास म्हटले की लवकर गाडीवर ट्रिपलसिट बस. आपल्याला वरखेड येथे एका जणाकडून पैसे घेवून लगेच परत यायचे आहे. आपले पैसे मिळणार या भोळ्या आणि खुळ्या आशेने भगत सुपडू बाबा गाडीवर दोघांच्या मागे ट्रिपलसिट बसले. सुपडू बाबा बसताच कुणालने भरकन गाडी पुढे दामटली.

वाटेत वरखेड नंतर पुढे त्याने कासोदा गावाच्या दिशेने गाडी हाकण्यास सुरुवात केली. काही अंतर पार केल्यानंतर कुणालने उजव्या हाताला एका दगडाच्या खदाणीत मोटार सायकल नेली. आता सुपडू बाबाचा अंत जवळ आला होता. काहीतरी अघटीत होणार याची रोहीतला कल्पना आली होती. खदाणीत जाताच कुणाल याने सुपडू बाबाला अर्वाच्च शिवीगाळ सुरु केली. आतापर्यंत सुपडू बाबाच्या मुखातून ऐकलेल्या शिव्यांचा पुरेपुर परतावा कुणालने दिला. सुपडू बाबाविषयी प्रचंड संताप मनात साठवलेल्या कुणालने त्याला लाथ मारुन खाली पाडले. सुपडू बाबा खाली पडताच कुणालने कमरेला खोचून आणलेल्या धारदार चाकूने त्याच्यावर सपासप वार सुरु केले. त्यावेळी रोहीतने भडगाव कासोदा दरम्यान डांबरी रस्त्याकडे धाव घेतली. रस्त्याने कुणी वाटसरु अथवा मोटार सायकल चालक खदाणीकडे येऊ नये याची पुरेपुर काळजी घेण्यासाठी रोहीतने घेण्यास सुरुवात केली.  

दरम्यान इकडे खदाणीकडे कुणालने सुपडू बाबाला जीवे ठार केले होते. जीवाच्या आकांताने विव्हळणा-या सुपडू बाबाची कुणाल यास जराही दया आली नाही. त्याला तशाच अवस्थेत बघून कुणाल आपला राग शांत करुन घेत होता. सुपडू बाबा जीवे ठार झाल्याचे लक्षात आल्यानंतर कुणालने रस्त्यावरील रोहीतला फोन केला. तु रस्त्यावरच थांब मी तिकडे मोटार सायकल घेऊन येतो. आपले काम झाले आहे. आपल्याला भडगावला परत जायचे आहे असे कुणालने रोहीतला फोनवर सांगितले. कुणालच्या निरोपानुसार रोहीत तेथेच त्याची वाट बघत थांबला.

काही वेळाने कुणाल त्याच्या ताब्यातील मोटार सायकलने रोहीतजवळ आला. त्याने रोहीतला डबलसिट बसवून भडगावच्या दिशेने गाडी हाकण्यास सुरुवात केली. नदीतून जाणा-या रस्त्याने दोघे अगोदर टोणगावला गेले. टोणगाव येथून निघाल्यानंतर कुणालने रोहीतला पाचोरा चौफुलीवर सोडले. त्यानंतर कुणाल एकटाच मोटार सायकलने चाळीसगाव रस्त्याने निघून गेला. आजच्या घटनेबद्दल कुणाला काही सांगू नको असे जातांना कुणालने रोहीतला बजावले. आता आपल्याला कुणाचा त्रास होणार नाही असे देखील कुणालने रोहीतला निघतांना म्हटले.

कुणाल निघून गेल्यानंतर रोहीत एकटाच पारोळा चौफुलीच्या दिशेने पायी जाऊ लागला. पारोळा चौफुलीनजीक गेल्यानंतर त्याने एका अनोळखी मोटार सायकल चालकास थांबवले. त्या अनोळखी मोटार सायकल स्वाराच्या मागे डबलसिट बसून रोहीतने भडगाव पेठ चौफुली गाठली. तेथून तो एकटाच घरी आला. त्याचे आई वडील घरी नव्हते. घरी एकटाच असलेला रोहीत रात्रीच्या घटनेमुळे क्षणभर घाबरला. त्याला एकांतात रडू देखील आले. मात्र काही वेळाने तो झोपी गेला.

8 मार्च 2024 चा दुसरा दिवस उजाडला. सकाळ झाली तरी भगत बाबा घरी आले नाही. त्यामुळे घरातील सदस्यांनी त्यांचा शोध सुरु केला. आपले वडील सकाळी लवकर उठून कुठेतरी गेले असतील असा अंदाज त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर याने मनाशी लावला. त्यानंतर ज्ञानेश्वर हा गुरांना चारापाणी देण्यासाठी खळ्यात निघून गेला. गुरांना चारापाणी दिल्यानंतर ज्ञानेश्वर हा सुमारे पावणे आठ वाजेच्या सुमारास पुन्हा घरी आला. त्याचवेळी त्याला त्याचा चुलत भाऊ अनिल याचा फोन आला. सुपडू बाबाचा खून झाला असल्याची माहिती त्याला अनिलकडून समजली. सुपडू बाबाचा खदाणीत खून झाला असल्याची माहिती भडगाव शहरात वा-यासारखी पसरली होती. आपल्या वडीलांचा खून झाल्याची माहिती समजताच ज्ञानेश्वर तातडीने अनिलच्या मोटार सायकलवर बसून घटनास्थळी रवाना झाला. या दोघांसोबत गावातील इतर नातेवाईकांचा ताफा देखील आपापल्या मोटार सायकलने घटनास्थळी निघाला होता.

या घटनेची माहिती समजल्यानंतर भडगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार हे देखील आपल्या सहकारी अधिकारी व कर्मचा-यांसह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावर भगत सुपडू बाबा हे मयत अवस्थेत पडलेले होते. त्यांच्या डोक्यावर, कपाळावर आणी चेह-यावर रक्त लागलेले होते. त्यांचा शर्ट रक्ताने भरलेला होता. धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला झाला होता. त्या हल्ल्यात ते मरण पावले होते.

घटनास्थळावरील पोलिस अधिकारी, कर्मचारी आणी जमावाच्या दृष्टीने यावेळी मारेकरी अज्ञात होता. मात्र मयत हा सर्वांच्या ओळखीचा होता. मयताची ओळख पटवण्याची गरज नसल्यामुळे तपासाचा निम्मा ताण कमी झालेला होता. केवळ मारेकरी कोण आणी त्याने भगत सुपडू बाबा यांचा खून का केला हे निष्पन्न करणे गरजेचे होते. पोलिस निरिक्षक पांडुरंग पवार यांनी मयत सुपडू बाबा यांचा मुलगा ज्ञानेश्वर याची विचारपुस करण्यास सुरुवात केली. या घटनेबाबत कुणावर संशय आहे का? अशी देखील ज्ञानेश्वरला विचारणा करण्यात आली. त्यावर मयत सुपडू बाबा यांचा मुलगा  ज्ञानेश्वर याने पोलिसांना सांगितले की गावातील कुणाल चुडामण मराठे याला सुपडू बाबा यांनी एक लाख रुपये काही महिन्यापुर्वी एका महिन्यात परत देण्याच्या बोलीवर उधार दिले होते. मात्र कुणाल मराठे याने ती रक्कम सुपडू बाबांना परत दिली नव्हती. त्यामुळे दोघांमधे वाद सुरु होता. काल 7 मे 2024 रोजी मयत सुपडू बाबा यांनी कुणाल मराठे याला फोन लावून पैशांची मागणी केली होती. त्यावेळी कुणालने सुपडू बाबांसोबत अरेरावी केली होती अशी देखील माहिती ज्ञानेश्वरने पोलिसांना दिली. त्यामुळे हा खून कुणाल चुडामन मराठे यानेच केला असावा असा संशय ज्ञानेश्वर याने पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्याजवळ व्यक्त केला. मयत सुपडू नाना पाटील यांच्या हत्येप्रकरणी त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर पाटील याने भडगाव पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. भाग 5 गु. र. न. 157/24 भा. द. वि. 302, 201 नुसार संशयीत कुणाल चुडामन मराठे याच्याविरुद्ध हा गुन्हा नोंद करण्यात आला.  

या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन  पो.नि. किसनराव नजनपाटील व त्यांच्या सहका-यांकडे देण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रीक मदतीने कुणाल चुडामन मराठे याचा ठावठिकाणा शोधून काढत त्याला ताब्यात घेत भडगाव पोलिसांच्या ताब्यात दिले. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक शेखर नारायण डोमाळे यांच्याकडे देण्यात आला. ताब्यातील संशयीत कुणाल मराठे यास पोलिस उप निरीक्षक शेखर डोमाळे यांनी न्यायालयात हजर केले असता सुरुवातीला  त्यास न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली. पोलिस कोठडी दरम्यान अटकेतील कुणाल मराठे याने आपला गुन्हा कबुल केला. या गुन्ह्यात आपला नातेवाईक साथीदार रोहीत मराठे याचा देखील सहभाग असल्याची माहिती कुणालने दिली. त्यामुळे रोहीत मराठे याला देखील ताब्यात घेत त्याची चौकशी करण्यात आली. चौकशी अंती त्याला देखील अटक संशयीत म्हणून अटक करण्यात आली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या पथकातील पोउपनिरी गणेश वाघमारे, सफौ विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, महेश महाजन, लक्ष्मण पाटील, राहुल पाटील, विजय पाटील, रमेश जाधव तसेच भडगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार व त्यांचे सहकारी पोलिस उप निरीक्षक शेखर डोमाळे आदींनी या गुन्ह्याच्या तपासकामी सहभाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक शेखर डोमाळे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here