कांताई नेत्रालयाचा उपक्रम – मतदानाचा हक्क बजावणाऱ्यांसाठी २१ नोव्हेंबरला विनामूल्य नेत्र तपासणी

जळगाव दि.१८ प्रतिनिधी –  शहरातील निमखेडी रोड व प्रतापनगर येथील कांताई नेत्रालयातर्फे मतदान करणाऱ्या नागरिकांसाठी २१ नोव्हेंबर रोजी विनामूल्य नेत्र तपासणी केली जाणार आहे. जे मतदार मतदान केल्याची डाव्या हाताच्या बोटावरील शाईची खूण दाखवतील, त्यांना नेत्र तपासणीत शंभर टक्के सूट दिली जाणार आहे. ही सवलत दि. २१ नोव्हेंबर २०२४ पुरतीच मर्यादीत असेल. सामाजिक जबाबदारीचे भान लक्षात घेऊन मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी कांताई नेत्रालयातर्फे ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे, या संधीचा जास्तीत जास्त जळगावकरांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. कांताई नेत्रालयातर्फे यापूर्वी महाराष्ट्र लोकसभा निवडणूकीच्यावेळी देखील अशी सवलत देण्यात आली होती. त्याला उत्तम प्रतिसाद लाभला होता. 

सर्व नेत्र रूग्णांना उच्च दर्जाची नेत्रसेवा उपलब्ध व्हावी हा उद्देशाने दि. १९ जानेवारी २०१६ रोजी कांताई नेत्रालयाची सुरवात करण्यात आली. जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांच्या दूरदृष्टीतून साकारलेल्या कांताई नेत्रालयात आधुनिक उपकरणे आणि अनुभवी डॉक्टरांची पूर्णवेळ उपलब्धता असून गेल्या आठ वर्षाच्या कालावधीत तीन लाखाहून अधिक नेत्ररूग्णांची नेत्रतपासणी आणि पंचवीस हजारहून अधिक यशस्वी नेत्र शस्त्रक्रिया  कांताई नेत्रालयाद्वारे केल्या गेल्या आहेत. कांताई नेत्रालयाच्या संचालिका डॉ. भावना जैन ह्या रेटिना सर्जन असून त्यांच्याच मार्गदर्शनाखाली कांताई नेत्रालयाची यशस्वी वाटचाल सुरु आहे.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here