पंधरा हजाराची लाच – दोघे पोलिसकर्मी जाळ्यात

जळगाव : तिस हजार रुपयांची लाच मागणी करुन तडजोडीअंती पंधरा हजाराची लाच स्विकारल्याप्रकरणी पारोळा पोलिस स्टेशनच्या दोघा पोलिस कर्मचा-यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एक पोलिस कर्मचारी लाचेची रक्कम स्विकारतांना रंगेहाथ आढळून आला तर दुसरा सहभागी पोलिस कर्मचारी फरार झाला आहे. हिरालाल देविदास पाटील यास रंगेहाथ लाचेची पंधरा हजार रुपयांची रक्कम स्विकारतांना धुळे एसीबी पथकाने पकडले आहे. प्रविण विश्वास पाटील हा दुसरा सहभागी कर्मचारी फरार होण्यात यशस्वी झाला आहे.

या घटनेतील तक्रारदार 7 नोव्हेंबर 2024 रोजी त्यांच्या ताब्यातील मोटार सायकलने पारोळा ते धरणगाव रस्त्याने जात होते. त्यावेळी त्यांच्या ताब्यातील मोटारसायकलची पलीकडून येणाऱ्या मोटरसायकलला धडक झाली. या धडकेत समोरील मोटार सायकलस्वार इसम मयत झाला. या घटने प्रकरणी तक्रारदाराविरुद्ध पारोळा पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात तक्रारदारास अटक न करण्यासाठी हे.कॉ. हिरालाल देविदास पाटील आणि प्रविण विश्वास पाटील या दोघांनी तिस हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती या दोघा पोलिस कर्मचा-यांनी पंधरा हजार रुपये स्विकारण्याची तयारी दर्शवली.

हे.कॉ. हिरालाल पाटील यांनी त्यांच्या मोबाईलवरुन हे.कॉ. प्रविण पाटील यांना फोन करुन तक्रारदारासोबत बोलणे करण्यास दिले. मोबाईलवरील या संभाषणात प्रविण पाटील यांनी तक्रारदारास लाचेची रक्कम हिरालाल पाटील यांच्याकडे देण्यास सांगितले. त्यानुसार हे.कॉ. हिरालाल पाटील यांनी तक्रारदाराकडून लाचेची पंधरा हजार रुपयांची रक्कम स्विकारली. त्याचवेळी दबा धरुन बसलेल्या धुळे एसीबी पथकाने हे.कॉ. हिरालाल पाटील यास रंगेहाथ पकडले. दरम्यान या घटनेची कुणकुण लागल्याने पलीकडून मोबाईलवर बोलणारा हे.कॉ. प्रविण पाटील फरार होण्यात यशस्वी झाला. पोलिस निरीक्षक तथा सापळा अधिकारी पंकज शिंदे यांच्या मार्गार्शनाखाली सापळा पथकातील हे.कॉ. राजन कदम, मुकेश अहिरे, सुधीर मोरे ,जगदीश बडगुजर पो.शि.रामदास बारेला, प्रवीण पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here