घरफोडीचा गुन्हा उघडकीस – एकास अटक

जळगाव : जळगाव शहरात भर दिवसा घरफोडी करणा-या रेकॉर्डवरील गुन्हेगारास  स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. रामानंद नगर पोलिस स्टेशनला दाखल घरफोडीचा गुन्हा उघडकीस आला आहे. धुळे येथील रहिवासी साहिल प्रविण झाल्टे उर्फ साहिल शेख असे अटक करण्यात आलेल्या पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराचे नाव आहे.

दि. 6 ऑक्टोबर 2024 रोजी रामानंद नगर परिसरातील रहिवासी तथा जेष्ठ नागरीक श्रीमती वनिता जगन्नाथ चौधरी या दुपारच्या वेळी प्रवचनाला गेल्या होत्या. त्या घरी नसतांना त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलुप तोडून घरफोडी झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यांच्या घरातील 237 ग्रॅम सोने, 400 ग्रॅम चांदी व रोख 16 हजार 500 रुपये असा मुद्देमाल चोरी झाला होता. या घटनेप्रकरणी अज्ञाताविरुद्ध रामानंद नगर  पोलिस स्टेशनला घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.  

या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करत होते. तपासादरम्यान हा गुन्हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील पवन नगर धुळे येथील राहणा-या साहिल प्रविण झाल्टे उर्फ साहिल शेख याने केल्याचे निष्पन्न झाले. त्याचा शोध घेण्याकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कार्यरत होते.

दरम्यान साहिल हा धुळे शहरात आला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. बबन आव्हाड यांना समजली होती. त्यामाहितीच्या आधारे गुन्हे शोध पथक त्याच्या मागावर होते. गुन्हे शोध पथकातील पो.उप.निरी.दत्तात्रय पोटे, सहायक फौजदार अतुल वंजारी, रवी नरवाडे, विजयसिंग पाटील, संजय हिवरकर, हे.कॉ. विजय पाटील, हरीलाल पाटील, राजेंद्र मेढे, पो.कॉ. प्रदिप चवरे, अक्रम शेख, ईश्वर पाटील आदींनी सलग दोन दिवस धुळे शहरात मुक्कामी राहून त्याचा शोध घेतला. अखेरीस 28 नोव्हेंबर रोजी तो पोलिस पथकाच्या जाळ्यात आला. त्याला अटक करण्यात आली. पुढील तपासकामी त्याला रामानंदनगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

साहिल झाल्टे याच्याविरुद्ध यापुर्वी खूनाचा प्रयत्न करणे, घरफोडी यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याने धुळे येथून जळगावला येत घरफोडीचा प्रकार केला. न्यायालयाने त्याला तिन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास रामानंद नगर पोलिस स्टेशनचे पो. उप निरीक्षक प्रदिप बोरुडे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here