जळगाव : घरफोडीच्या गुन्ह्यातील अट्टल गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज अटक केली. प्रवीण सुभाष पाटील (रा. बिलवाडी तालुका जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या घरफोड्याचे नाव आहे. पुढील तपासकामी त्याला अमळनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
26 नोव्हेंबर रोजी दहिवद ता. अमळनेर या गावात भर दिवसा पाच घरे फोडून कपाटातून रोख रक्कम व दागिने अज्ञात इसमाने काढून नेले होते. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याची पद्धत बघता हा गुन्हा रेकॉर्डवरील गुन्हेगार व अमळनेर तालुक्यातील दहिवद येथील रहिवासी प्रविण पाटील याने केल्याचा तर्क लावण्यात आला. तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे तपास केला असता त्याच्यावर संशय बळावला.
प्रविण पाटील यास ताब्यात घेत त्याची सखोल चौकशी केली असता त्याने या गुन्ह्याची कबुली दिली. या गुन्ह्यात चोरी झालेल्या मुद्देमालापैकी 1 लाख 97 हजार रुपये रोख, 36 हजार रुपये किंमतीची पिवळया धातुची अंगठी व गुन्ह्यात वापरलेली 60 हजार रुपये किमतीची बजाज पल्सर मोटार सायकल असा एकुण 2 लाख 93 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. बबन आव्हाड यांच्या पथकातील पोउपनिरी गणेश वाघमारे, हे.कॉ. संदीप पाटील, प्रविण मांडोळे, नंदलाल पाटील, भगवान पाटील, राहुल कोळी, भारत पाटील आदींनी या गुन्ह्याच्या तपासकामी सहभाग घेतला.