जळगाव : 45 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी माजी माहिती आयुक्त तथा तांत्रीक सल्लागार व्हि.डी. पाटील यांच्यासह नऊ जणांविरुद्ध जळगाव येथील रामानंद नगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हि.डी. पाटील यांच्यासह कार्यकारी अभियंता गोकुळ कोळी, गोल्ड रिव्हर (मुंबई) कंपनीचे सुर्यवीर चव्हाण, सनदी लेखापाल, सुहास भट (मुंबई), व्हि.के.जैन, पवन कोलते, ललित चौधरी, पंकज नेमाडे आदींच्या नावांचा या गुन्ह्यात संशयीत आरोपी म्हणून समावेश करण्यात आला आहे. तापी पाटबंधारे महामंडळाच्या आजी माजी अधिका-यांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने जळगाव शहरात खळबळ माजली आहे.
शेततळ्याची कामे मिळवून देण्याचे आमिष दाखवत 45 लाख रुपयात फसवणूक झाल्याचा अजय बढे यांचा आरोप असून या प्रकरणी त्यांनी पोलिस प्रशासनाकडे धाव घेतली होती. या प्रकरणी केवळ दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करावा असे आर्थिक गुन्हे शाखेकडून बढे यांना कळवले होते. या आदेशाविरुद्ध बढे यांनी कनिष्ठ न्यायालय जळगाव येथे धाव घेतली होती. न्यायालयाने सर्व बाबी लक्षात व्हि.डी. पाटील यांच्यासह एकुण नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाविरुद्ध व्हि.डी.पाटील यांच्यासह इतरांनी जिल्हा न्यायालयात दाद मागितली होती. कनिष्ठ न्यायलयाचा आदेश कायम ठेवून व्हि.डी. पाटील व इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा निर्णय अप्पर जिल्हा न्यायधिश न्या.एस.आर. पवार यांनी दिला. अजय बढे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार न्यायालयीन आदेशाने रामानंद नगर पोलिस स्टेशनला याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे.