जळगाव : सिमा तपासणी नाक्यावर नियुक्ती दिल्याच्या मोबदल्यात खासगी पंटरच्या माध्यमातून तिन लाख रुपये लाच स्विकारल्या प्रकरणी जळगाव प्रादेशिक परिवहन अधिकारी दिपक अण्णा पाटील व खासगी पंटर अशा दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेतील तक्रारदार अधिका-यास सीमा तपासणी नाका नवापूर येथे नोव्हेंबर 2024 या महिन्यात नियुक्ती देण्यात आली होती. या नियुक्तीच्या मोबदल्यात लाचेच्या स्वरुपात तिन लाख रुपये देण्यास आरटीओ दिपक पाटील यांनी तक्रारदारास प्रोत्साहन दिले. तसेच खासगी पंटर मार्फत लाच स्विकारली. या बाबत तक्रारदाराने संभाजीनगर एसीबी कार्यालयात तक्रार केली होती. खासगी इसमाने तिन लाख रुपये लाचेची रक्कम स्विकारल्यानंतर संभाजीनगर एसीबी पथकाने कारवाई केली.
सापळा अधिकारी तथा पोलिस निरीक्षक अमोल धस यांच्या पथकातील सापळा सहाय्यक अधिकारी सुरेश नाईकनवरे पो. हे.कॉ. अशोक नागरगोजे, युवराज हिवाळे, पोलिस अंमलदार विलास चव्हाण, सचिन बारसे, सी एन बागुल आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.