जळगाव : दरोड्याच्या तयारीत असलेल्या सात जणांना त्यांच्या ताब्यातील शस्त्रांसह भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. अटकेतील आरोपींविरुद्ध भुसावळ बाजार पेठ पोलीस स्टेशनला रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
8 डिसेंबर 2024 रोजी रात्रीच्या वेळी भुसावळ नागपूर हायवे लगत असलेल्या वाटर पार्कच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत अग्निशस्त्र व इतर घातक हत्यारांसह हे सर्वजण दरोडा टाकून गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत होते. याबाबत खात्रीलायक गोपनीय माहिती बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना समजताच त्यांनी आपल्या शोध पथकाला पुढील कारवाईकामी रवाना केले.
गावठी बनावटीचे पिस्टल, राऊंड, तलवारी, चाकू, फायटर, मिरचीची पूड असा ऐवज अटकेतील आरोपींच्या ताब्यातून हस्तगत करण्यात आला. भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक मंगेश बेंडकोळी, पो हे कॉ महेश चौधरी, पो ना सोपान पाटील, पो शि प्रशांत सोनार, भुषण चौधरी, प्रशांत परदेशी, योगेश माळी, राहुल वानखेडे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.