जळगाव : पंधरा हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या जळगाव शहर महानगरपालिकेच्या नगररचना सहाय्यकास एसीबी पथकाने अटक केली आहे. मनोज समाधान वन्नेरे असे या लाचखोर नगर रचना सहाय्यकाचे नाव आहे.
एका प्रकरणात अगोदर 21 हजार रुपये तसेच दुसऱ्या प्रकरणात 15 हजार रुपये अशी एकूण 30 हजार रुपयांच्या लाचेची या नगर रचना सहायकाने मागणी केली होती. पहिल्या प्रकरणात तडजोडीअंती 15 हजार रुपयांची लाच स्वीकारताना जळगाव एसीबी पथकाने मनोज समाधान वनेरे यास ताब्यात घेत अटक केली आहे.
या घटनेतील तक्रारदार यांना त्यांच्या बांधकाम परवानगीचे व बांधकाम झालेल्या घराचे भोगवटा प्रमाणपत्र देण्याचे प्रकरण मंजूर करून घ्यायचे होते. या मंजुरीच्या परवानगीसाठी त्यांनी नगर रचना विभाग मनपा जळगांव येथे एकूण तीन प्रकरणे दाखल केली आहेत. त्यात पहिले प्रकरण पडताळणीसाठी पाठवले असता नगररचना सहाय्यक मनोज वनेरे यांनी सुरुवातीला तक्रारदारास 21 हजार रुपये व तडजोडीअंती 15 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. याशिवाय दुसऱ्या प्रकरणात 15 हजार रुपयांची मनपा आयुक्त व सहाय्यक संचालक (अतिरिक्त कार्यभार) नगर रचना विभाग, मनपा जळगाव यांच्यासाठी एकूण 30 हजार रुपयांची लाच मागणी केली.
सापळा व तपास अधिकारी तथा पोलीस उप अधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा पथकातील पोलीस उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, पोलीस उप निरीक्षक सुरेश पाटील, पोलीस नाईक किशोर महाजन, राकेश दुसाने आदींनी या कामगिरी सहभाग घेतला.