जळगाव : जळगाव शहर महानगर पालिका भ्रष्टाचार आणि गैर व्यवहाराच्या बाबतीत चर्चेत असतांना सहायक आयुक्त गणेश चाटे यांनी एका पत्रकाराचा कॅमेरा हिसकावल्याची घटना समोर आली आहे. सहायक आयुक्त गणेश चाटे यांच्याविरुद्ध या घटने प्रकरणी जळगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहर महानगर पालिकेच्या गैर व्यवहाराबाबतची बातमी पत्रकार कापडणे यांनी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर या घटनेबाबत व्हिडीओ शुटींग करण्याकामी पत्रकार विक्रम कापडणे हे महानगर पालिकेच्या लेखा विभाग परिसरात आले. त्यावेळी गणेश चाटे यांनी पत्रकार विक्रम कापडणे यांचा कॅमेरा हिसकावला. तो कॅमेरा त्यांनी ज्या कर्मचा-याला दिला त्याने त्यातील मेमरी कार्ड काढून घेतले.
या घटने प्रकरणी पत्रकार विक्रम कापडणे यांनी आरटीआय कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांची भेट घेत आपली व्यथा त्यांच्याजवळ कथन केली. सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी तातडीने विक्रम कापडणे यांना सोबत घेत सहायक आयुक्त चाटे यांची भेट घेत कायद्याचा आधार घेत जाब विचारला. ऑफीशियल सिक्रेट अॅक्ट या कायद्याच्या आधारे गुप्ता यांनी चाटे यांच्याशी चर्चा केली. आपण पत्रकाराचा कॅमेरा कोणत्या कायद्याच्या आधारे हिसकावला असा थेट प्रश्न गुप्ता यांनी चाटे यांना विचारला. दरम्यान गुप्ता यांनी या जाब विचारण्याच्या घटनेची व्हिडीओ शुटींग सुरु ठेवली होती.
आपण सुरु असलेली व्हिडीओ शुटींग बंद करावी त्यानंतर चर्चा करावी असे सहायक आयुक्त गणेश चाटे यांनी गुप्ता यांना म्हटले. मात्र शासकीय कार्यालयात व्हिडीओ शुटींग करणे कायद्याविरुद्ध नाही असे गुप्ता यांनी चाटे यांना ठणकावून सांगितले. अखेरीस सहायक आयुक्त गणेश चाटे यांनी पत्रकार कापडणे यांचा कॅमेरा परत करण्याची सुचना कर्मचा-यास दिली. मात्र कॅमे-यातील मेमरी कार्ड काढून घेण्यात आले होते. त्यामुळे पुन्हा एकवेळा त्यावर जोरदार चर्चा झाली. पत्रकाराच्या बाजूने आपली बाजू कायद्याच्या आधारे भक्कम मांडणा-या गुप्ता यांचे पत्रकार विक्रम कापडणे यांनी आभार मानले.