जळगाव : महिला सहाय्यक वीज वितरण अभियंत्यासह लाईनमन आणि वरिष्ठ तंत्रज्ञ अशा तिघांविरुद्ध चार हजार रुपयांच्या लाच प्रकरणी जळगाव एसीबी पथकाने कारवाई केली असून त्यांच्याविरुद्ध फैजपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कविता भरत सोनवणे (सहाय्यक अभियंता म.रा.वि.वि कंपनी मर्या सावदा – वर्ग-2), संतोष सुकदेव इंगळे (लाईनमन म.रा.वि.वि कंपनी मर्या सावदा – वर्ग-3) आणि कुणाल अनिल चौधरी (वरिष्ठ तंत्रज्ञ) अशी तिघांची नावे आहेत. तिघेही कक्ष कार्यालय पाडळसा येथे कार्यरत आहेत.
यातील तक्रारदार हे हॉटेल व्यवसायिक असून त्यांच्या हॉटेलवर लावलेले जुने मीटर काढून नवीन मीटर लावण्यात आले. तक्रारदार यांनी जुन्या मीटरमध्ये फॉल्ट केला आहे असे भासवून तक्रारदार यांच्या वतीने सकारात्मक अहवाल पाठवण्याच्या मोबदल्यात तिघांनी तक्रारदाराकडे सुरुवातीला 20 हजार नंतर पंधरा हजार व तडजोडीअंती 4 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. लाईनमन संतोष इंगळे यांनी चार हजार रुपयांची लाच तक्रारदाराकडून स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबी पथकाने त्यांना रंगेहात पकडले.
पर्यवेक्षण अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा व तपास अधिकारी श्रीमती नेत्रा जाधव पोलीस उप निरीक्षक दिनेशसिंग पाटील, पोना किशोर महाजन, पो कॉ राकेश दुसाने आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.