जळगाव : चाकू हल्ला करुन दहा हजार रुपये बळजबरी हिसकावून पळून जाणा-या पाच जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. या घटने प्रकरणी मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला होता. प्रेम उर्फ गोपी अनिल धामणे, रोहीत उर्फ दादु संजय नवघीरे, रिहान शहा करीम शहा, मिशन रफिक शेख, कुंदन अनिल पठाळे अशी अटक करण्यात आलेल्या भुसावळ येथील रहिवासी व रेकॉर्डवरील गुन्हेगारांची नावे आहेत.
19 डिसेंबर 2024 रोजी मुक्ताईनगर येथील प्रवर्तन चौकात या पाच जणांनी दोघांवर चाकूने वार करुन त्यांच्या हातातील दहा हजार रुपयांची पिशवी हिसकावून घेत पलायन केले होते. गुन्ह्याच्या वेळी वापरलेला गावठी कट्टा, चार मोबाईल, बुलेट व हिसकावलेले दहा हजार रुपये आदी मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेसह मुक्ताईनगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.