जळगाव, दि.२३ (प्रतिनिधी) – महात्मा गांधीजींनी असहयोग आंदोलन आणि सविनय कायदेभंगाद्वारे सर्वसामान्यांमध्ये स्वातंत्र्याची प्रेरणा जागृत केली. त्यामुळेच ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र्याचा मोठा लढा उभारला गेला, असे विचार अनिल नौरिया यांनी व्यक्त केले. येथील गांधी रिसर्च फाऊंडेशन व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी व्याख्यानमालेंतर्गत सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता व सुप्रसिद्ध इतिहासकार अनिल नौरिया यांचे “असहयोग आंदोलन – स्वतंत्रता संग्राम की अनोखी मशाल” या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते त्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर वक्ते अनिल नौरिया, गांधी रिसर्च फाउंडेशनच्या प्रशासकीय विभागाच्या प्रमुख अंबिका जैन, प्राचार्या डॉ. गौरी राणे, गांधी रिसर्च फाउंडेशनचे सहकारी डॉ. अश्विन झाला उपस्थित होते.
आपल्या व्याख्यानाच्या सुरुवातीलाच नौरिया यांनी असहयोग आंदोलन व सविनय कायदेभंग यातील फरक समजावून सांगितला. आपल्या न्याय व हक्काची मागणी अहिंसेच्या मार्गानेच केली पाहिजे याचा गांधीजींचा अट्टाहास असायचा. यासाठी महात्मा गांधीजी आंदोलन करण्यासाठी पूर्व तयारी करून घेत असत. कुणाला काय जबाबदारी द्यायची हे ठरलेले असे. अगदी जिल्ह्याची, व्यक्तीची निवड करतांना विशिष्ट निकषांवर केली जात असे. यात अहिंसा, स्वदेशीचा वापर, बलिदान देण्याची तयारी, हिंदु मुस्लिम एकता, सामाजिक सौहार्दता याचा समावेश असे. स्पृश्य, अस्पृश्य हा भेद नसावा इत्यादीबाबत महात्मा गांधी सजगतेने त्याची चाचणी स्वतः घेत असत असेही त्यांनी सांगितले. याच आधारावर गुजरातमधील बारडोली, खेडा आणि आंध्र प्रदेश राज्यातील गुंटुर या जिल्ह्यांचा विचार करण्यात आला होता. १९१९ च्या असहकार आंदोलनानंतरच सर्व भारतीय खुलेपणाने स्वातंत्र्याची मागणी करू लागले. याच काळात कला, साहित्याची देखील भरपूर निर्मिती झाली. याबाबतचे उदाहरणे सांगत त्यांनी महात्मा गांधीजींच्या असहकार आंदोलनाचे एक एक पदर उलगडून सांगितले.
आरंभी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. ‘गांधी होंगे कही भारत में’ गाण्याची ध्वनिफीत वाजविली गेली. यावेळी डॉ. अण्णासाहेब बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या गौरी राणे यांनी देखील संवाद साधला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. झाला यांनी केले. १९२४ पर्यंत हे आंदोलन सुरु होते. या आंदोलनाच्या शताब्दी वर्षानिमित्ताने असहयोग आंदोलन या विषयावर हे व्याख्यान आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी झालेल्या तीन व्याख्यान व वक्ते याबाबत त्यांनी उपस्थितांना माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गिरीश कुलकर्णी यांनी केले तर आभार चंद्रशेखर पाटील यांनी मानले. या कार्यक्रमास बेंडाळे महाविद्यालयाचे उप-प्राचार्य विजय पाटील, प्राध्यापक, ज्येष्ठ गांधीयन अब्दुलभाई, गांधी रिसर्च फाउंडेशनचे उदय महाजन व सहकारी यांची उपस्थिती होती.