जळगाव : एरंडोल येथे मातेने तिच्या नऊ वर्षाच्या मुलीसह गळफास घेत जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. आपल्या आत्महत्येस कुणीही जबाबदार नाही अशा स्वरुपाचा मजकूर घटनास्थळी महिलेच्या हस्ताक्षरातील चिठ्ठीत आढळून आला आहे. महादेव मंदीर परिसरात गुरुवारी दुपारी तिन वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. सपना प्रकाश माळी (33) आणि केतकी माळी (9) अशी या मृत माय- लेकींची नावे आहेत. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
माहेरी रहात असलेल्या मयत सपना माळी यांचा सुमारे आठ वर्षापुर्वी घटस्फोट झाला होता. तिसऱ्या मजल्यावरील खोलीचा दरवाजा आतून बंद होता. सपनाचा भाऊ राहुल हा घरी आला असता त्याला त्याची बहीण व भाची नजरेस पडली नाही. त्याने बहिणीला आवाज दिला असता आतून कोणतेही उत्तर आले नाही. अखेर दरवाजा तोडला असता घटना उघडकीस आली. या घटनेप्रकरणी एरंडोल पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.