जालना : घनसावंगी तालुक्यातील पानेवाडी येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची तिजोरी सात लाख रुपयांच्या रोकडसह चोरट्यांनी चोरुन नेली होती. या चोरीचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासात लावला. यासह मुद्देमालासह तिघा आरोपींना अटक देखील केली.पानेवाडी येथे जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा आहे. या शाखेच्या तिजोरीत जवळपास साडेसात लाख रुपये ठेवलेले होते. शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी ही तिजोरीच पळवून नेली. या घटनेचा पुरावा राहू नये म्हणून चोरट्यांनी सीसीटीव्हीची नासधूस करत डीव्हाईस देखील चोरुन नेले होते.
या चोरीची तक्रार बॅंकेच्या वतीने व्यवस्थापकाने केली होती. या गुन्हयाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे दिला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक एस. चैतन्य व अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे गौर, पोलीस उपनिरीक्षक दुर्गेश राजपूत, कुरेवाड, देशमुख, मगरे, कायटे, बगाटे, गडदे, सागर बावीस्कर, कृष्णा तंगे, चौधरी, फलटणर, उबाळे, मांटे, जाधव, चेके, जायभाये आणि पैठणे आदी करत होते.चोरट्यांनी पळवून नेलेल्या तिजोरीत सात लाख २८ हजार रुपये ठेवलेले होते.
पोलिसांनी आरोपीकडून बँकेची तिजोरी, चोरीसाठी वापरलेली जीप व दुचाकी हस्तगत केली. चोरीच्या पैशातून घेतलेला टीव्ही गजानन शिंगाडे या आरोपीकडून जप्त करण्यात आला. पोलिसांनी एकूण सहा लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक पोलिस निरिक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी जालना येथील शिकलकरी मोहल्ला परिसरात अचानक छापा टाकून हरदीपसिंग बबलूसिंग टाक याला आपल्या जाळ्यात ओढले. त्याची चौकशी केली असता त्याच्या इतर साथीदारांची नावे पुढे आली. पोलिसांनी त्याचे सहकारी गोपीसिंग मलखामसिंग कलाणी, किशोरसिंग ऊर्फ टकल्या रामसिंग टाक, गजानन सोपान शिंगाडे (रा. पाचनवडगाव) यांना ताब्यात घेत अटक केली.
तिजोरीतील रक्कम काढून घेतल्यानंतर चोरट्यांनी ती तिजोरी जालना शहरातील द्वारकानगरच्या मागे असलेल्या खदानीत फेकून दिली. पोलिसांनी जेसीबीच्या मदतीने ती तिजोरी ताब्यात घेतली. गुन्ह्यात वापरलेली जीप देखील ताब्यात घेण्यात आली आहे. ती जीप चोरट्यांनी श्रीकृष्ण नगर संभाजीनगर येथून चोरली होती. या जीप चोरीप्रकरणी सदर बाजार पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे.