पोलीस असल्याची बतावणी करत पळवले लाखोचे दागिने 

जळगाव : पोलीस असल्याची बतावणी करत दोघा भामटयांनी सेवानिवृत्त जेष्ठ नागरिकाच्या ताब्यातील 2 लाख 65 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लबाडीने पळवून नेल्याची घटना दिपनगर परिसरात घडली. या घटने प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळ शहरातील खळवाडी परिसरात राहणारे सेवानिवृत्त कर्मचारी वसंत जगन्नाथ पाटील व त्यांच्यासोबत एक जण असे दोघे दीपनगर बस स्थानक परिसरात एक्टिवा गाडीने 5 डिसेंबर रोजी सोबत जात होते. त्यावेळी दोन अनोळखी इसमांनी त्यांना पोलीस असल्याची बतावणी करत अडवले. 

आम्ही पोलीस आहोत, तुम्हाला मी सिटी मारली, तुम्ही थांबले का नाहीत, या रस्त्याने म्हातारीला लुटलेले आहे, तुम्ही काय एवढे सोने घालून चालले आहेत, ते सोने काढा असे दोघे अनोळखी इसम वसंत पाटील यांना सांगू लागले. 

वसंत पाटील यांच्याजवळ असलेले सोने व कागदपत्रे गाडीच्या डिक्कीत ठेवून देण्याचा बहाणा करत दोघांनी हातचलाखीने 2 लाख 65 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेत दोघांनी पलायन केले. याबाबत दाखल गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकिशोर काळे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here