पाळधी गावात कलम 163 लागू – उपविभागीय दंडाधिकाऱ्यांचे आदेश

जळगाव : धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे 31 डिसेंबरच्या रात्री दहा वाजेच्या सुमारास किरकोळ वाद झाला. या वादातून पाळधी गावात काही ठिकाणी जाळपोळ करण्यात आल्याच्या घटना घडल्या. मात्र पोलीस प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करून परिस्थिती नियंत्रणात आणली. काही काळानंतर पुन्हा काही भागांमध्ये जाळपोळ करण्यात आली. पाळधी व लगतच्या परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी तसेच जनजीवन सुरळीत रहावे यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 चे आदेश लागू करण्यात आले आहे.

एरंडोल उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी प्राप्त अधिकाराचा वापर करुन पाळधी या संपूर्ण गावाचे हद्दीत दिनांक 01/01/2025 रोजी सकाळी 03.30 वाजेपासून ते दिनांक 02/01/2025 रोजी सकाळी 06.00 वाजेपावेतो भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 चे आदेश लागू करीत असल्याचे आदेश दिले आहे.

या आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित व्यक्ती / संस्था / संघटना यांच्या विरुध्द प्रचलित कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. हा आदेश अत्यावश्यक सेवा उदा. रूग्णसेवा, पाणीपुरवठा, सार्वजनिक वितरण व्यवस्था. अंत्यविधी व शासकीय कर्मचारी यांना लागू राहणार नाही. असे निवृत्ती गायकवाड यांनी दिलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here