जळगाव, १ जानेवारी २०२५- (प्रतिनिधी):- जैन इरिगेशन जळगाव व भारतीय कृषी अनुसंधान (ICAR), सेंट्रल इन्स्टीट्यूट ऑफ सबट्रॉपिकल हॉर्टीकल्चर रिसर्च लखनौ(CISH) आणि अॅग्रीइनोव्हेट इंडिया, नवी दिल्ली, यांच्यात जैन केळीच्या टिश्यू कल्चर रोपांमध्ये फ्युसारीयम विल्ट रोगाला प्रतिकार करणाऱ्या तंत्रज्ञानासाठीचा सामंजस्य करार (एमओयु) नुकताच करण्यात आला. या करारावर डॉ. टी, दामोदरन, संचालक सीआयएसएच लखनौ, डॉ. प्रवीण मलीक, सीईओ, अॅग्रीइनोव्हेट इंडिया, नवी दिल्ली, डॉ. अनिल पाटील, उपाध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. यांनी डॉ. व्ही. बी. पटेल, उपमहासंचालक भारतीय कृषी अनुसंधान, डॉ. बालकृष्ण यादव, डॉ. के. बी. पाटील, डॉ. अनिल ढाके यांच्यासह २०० प्रगतीशील केळी बागायतदारांच्या उपस्थितीत हा सामंजस्य करार सोहळा पार पडला.
टिश्यू कल्चर केळी रोपांची निर्मिती करत असतानांच्या प्रकियेतच बायोइम्युनायझेशन करण्याचे तंत्रज्ञान आय़सीएआर, सीआयएसएच, लखनौ यांनी हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्यामुळे प्रतिकारक रोपांची निर्मिती होऊन ती रोप फ्युसारियम विल्ट रोगाला आळा घालू शकतील. रोपांच्या प्रायमरी व सेकंडरी हार्डनिंगमध्येसुद्धा बायोइम्युनायझेशन करण्यात येणार आहे.
जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन म्हणाले की, ‘भारतात फ्युसारियम विल्ट रोगाचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी देशात व आंतरराष्ट्रीय सतरावर जे जे तंत्रज्ञान उपलब्ध आहे ते स्वीकारून केळी उत्पादकांना सशक्त व प्रतीकारक रोपांची निर्मिती व पुरवठा करण्याचे आमचे धोरण आहे. आयसीएआर सोबतचा तंत्रज्ञान हस्तांतराचा हा करार म्हणजे केळीला सुरक्षित ठेवण्याचे एक महत्वाचे पाऊल आहे.’ डॉ. व्ही. बी. पटेल यांनी ‘या तंत्रज्ञानाने केळी उत्पादकांना फायदा होईल’ असे म्हटले तर डॉ. टी दामोदरन यांनी ‘हे तंत्रज्ञान कसे काम करते यावर मार्गदर्शन केले. जैन इरिगेशन ही देशामधील अग्रगण्य कंपनी असल्याने या तंत्रज्ञानाचा अधिकाधिक प्रसार होईल.’
डॉ. प्रविण मलीक यांनी या तंत्रज्ञानाने केळीची शेती कशी शाश्वत करता येईल असे म्हटले तर डॉ. के. बी. पाटील यांनी प्रत्येक गावाच्या, जिल्हा तसेच राज्याच्या सीमेवर टायर बाथ, फुट बाथ ही संकल्पना राबवून वाहनांच्या चाकाद्वारे किंवा मजूरांच्या पायातील बूट चप्पलद्वारे या रोगाचा प्रसार होऊ नये यासाठी खबरदारी घेणे अपरिहार्य असल्याचे सांगितले. बायोइम्युनायझेशन तंत्रज्ञानामुळे फ्युसारियम विल्ट रोगाला आळा घालता येईल व रोगाच्या व्यवस्थापनासाठी मदत होईल.