दोंडाईचात भरदिवसा चाकूच्या धाकावर हिसकावले दागीने

On: September 7, 2020 11:11 PM

दोंडाईचा : विक्रीला काढलेले घर पाहण्याच्या निमित्ताने घरात येवून लहान मुलाला चाकूचा धाक दाखवत महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटून नेल्याची घटना आज भरदुपारी दोन वाजता दोंडाईचा येथे घडली. पन्नास हजार रुपयांचे दागीने लुटून नेल्याच्या या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कायदेशीर कारवाई सुरु केली.

दोंडाईचा शहरातील शिवकॉलनी भागातील प्लॉट क्र १७ येथे हेमंत पवार यांचे निवासस्थान आहे. या घरात रोटरी इंग्लिश स्कूलचे शिक्षक भरत पवार भाडेकरु आहेत. ते शाळेत गेले असतांना त्यांची पत्नी जयश्री व आठ वर्षाचा मुलगा असे दोघे घरात होते. घरमालक हेमंत पवार यांनी ते घर विक्रीला काढले आहे. घर खरेदी करण्याच्या बहाण्याने ते बघण्याचे निमित्त करत एक पुरुष, एक महिला व एक मुलगा असे घरात आले. जयश्री पवार त्यांना किचन दाखवत असताना आलेल्या पुरुषाने गेट लावून घेतले.

त्यांंच्या सोबतच्या मुलाने अनाधिकारे कपाट उघडले. त्याचवेळी झोपलेल्या मुलाला चाकू लावून महिलेला अंगावरील दागिने काढण्यास बजावले. सोन्याचे मंगळसूत्र व कानातल्या रिंगा बळजबरी हिसकावल्या. जयश्री पवार जोरात ओरडतील हे लक्षात आल्यामुळे डोक्यात चाकूसारखी वस्तू मारण्यात आली.
भाडेकरी शिक्षक भरत पवार घरी आल्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळावर स.पो.नि. पंजाबराव राठोड, उपनिरीक्षक डॉ़ संतोष लोले व त्यांच्या पथकाने धाव घेतली. या घटने प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment