घाटंजी, यवतमाळ ( अयनुद्दीन सोलंकी) : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक उर्दू शाळा, चिखलवर्धा केंद्र कुर्ली पं. स. घाटंजी येथील विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद मार्फत घेण्यात येणाऱ्या महादीप परीक्षेमध्ये उत्तम कामगिरी केली आहे. शाळेतील सात विद्यार्थी जिल्हास्तरीय परीक्षेसाठी पात्र ठरले होते. त्यापैकी वर्ग पाचवीचा विद्यार्थी इरतेजा मुदस्सर शेख जिल्ह्यातून चौथा व कुमारी अफशा अब्दुल मतीन जिल्ह्यातून पाचवी आली.
वर्ग सहावी मधून कु. इनाया वसीमोद्दीन पठाण जिल्ह्यातून प्रथम क्रमांक आली असून विमानवारीसाठी पात्र ठरली आहे. तसेच या शाळेतील वर्ग सहावीचा विद्यार्थी सय्यद कैफ सय्यद मोहम्मद याचा दुसरा क्रमांक आला आहे. सहावीचा मोहम्मद नवीन अब्दुल गणी याने पाचवा क्रमांक मिळवला आहे. शाळेतील वर्ग सातवीची विद्यार्थिनी कु. माहीन सहेर शेख फिरोज हिने जिल्ह्यातून दुसरा तसेच आलिया अब्दुल मतीन हिने जिल्ह्यातून तिसरा क्रमांक मिळवला आहे.
जिल्हा परिषद मार्फत घेण्यात आलेल्या अशा कठीण परीक्षांमध्ये एका शाळेतील सात विद्यार्थ्यांनी उत्तम अशी कामगिरी केल्याबद्दल चिखलवर्धा गावामध्ये सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे. महादीप करिता वर्ग घेणारे शाळेतील शिक्षक मोहसीन चव्हाण तसेच शाळेतील मुख्याध्यापक नादिर सर व शिक्षिका शमीम मॅडम व सीतारा मॅडम यांच्याकडून सदर विद्यार्थ्यांचा स्वागत करण्यात आले व गावातील नागरिक शाळा व्यवस्थापन समिती व पालक वर्गाकडून ही सदर विद्यार्थ्यांचा स्वागत करण्यात आले व शुभेच्छा देण्यात आले.