चाळीसगावला दगडफेकीसह हवेत गोळीबार

जळगाव : चाळीसगाव शहरातील पोदार शाळा परिसरात मोटार सायकलवर आलेल्या काही अनोळखी व्यक्तींनी 7 तारखेच्या मध्यरात्री पावणेबारा वाजेच्या सुमारास दगडफेकीसह हवेत गोळीबार केल्याची घटना उघडकीस आली आहे. सुमित भोसले यांच्या घरावर दगडफेकीसह हवेत गोळीबार झाल्याने परिसरात खळबळ माजली आहे.

या घटनेची माहिती समजल्यानंतर चाळीसगाव शहर पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र दरम्यानच्या कालावधीत दगडफेकीसह हवेत गोळीबार करणारे अनोळखी पळून जाण्यात यशस्वी झाले. मात्र घटनास्थळावरुन पोलिसांना एक जिवंत काडतूस, तीन रिकाम्या पुंगळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. सारंग बेलदार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा गुन्हा सुमित भोसले व महेंद्र (बाळू) मोरे यांच्या मुलांमधील पूर्ववैमनस्यातून झाला असावा असे म्हटले जात आहे. दरम्यान  संशयित महेंद्र (बाळू) मोरे यांच्या मुलांचा शोध घेण्यासाठी पोलिस पथक गेले असता त्या ठिकाणी कुणी आढळून आले नसले तरी घरात घातक हत्यारे आढळून आली आहेत. कोयता, गुप्ती, सहा जिवंत राऊंड, एक स्टीलची परशू, कु-हाड, एक बेसबॉल खेळण्यासाठी वापरण्यात येणारी लाकडी बॅट अशा हत्यारांचा यात समावेश आहे. पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी व त्यांचे सहकारी पुढील तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here