जळगाव दि.१७ प्रतिनिधी – विद्यार्थ्यांनी सिगारेट व इतर व्यसनांपासून दूर राहावे, वाहतुकीचे नियम पाळावेत, आणि पोलिस दलात करिअर घडवण्यासाठी प्रयत्नशील रहावे, असे मार्गदर्शन पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी केले. महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त आयोजित शस्त्र, श्वान पथक, वायरलेस, पोलीस बॅण्ड, बॉम्ब शोधक व नाशक पथकाचे प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपअधीक्षक संदीपकुमार गावीत, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.च्या पर्सोनेल विभागाचे वरिष्ठ व्हाईस प्रेसिडेंट सी. एस. नाईक, युवाशक्ती फाऊंडेशनचे विराज कावडिया उपस्थित होते. त्यासोबत शनिपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आर.टी.धारबळे, रामानंदचे राहुल गुंजाळ, तालुका पोलीस स्टेशनचे संजय गायकवाड, शहर पोलीस स्टेशनचे अनिल भवारी, मुख्यालयातील राखीव पोलीस उपनिरीक्षक मंगल पवार, पीएसआय राजेश वाघ यांच्यासह अधिकारी व पोलीस दलातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जळगाव जिल्हा पोलीस दल, भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शस्त्र प्रदर्शना ७००० च्यावर विद्यार्थ्यांनी भेट देऊन पोलीसांशी संवाद साधला आणि शस्त्रां संबंधित माहिती समजून घेतली. हा उपक्रम गेल्या १० वर्षांपासून जळगावकरांसाठी आयोजित केला जातो. शस्त्र प्रदर्शनातून पोलीस दलाची ओळख झाली. शस्त्र प्रदर्शनात विद्यार्थ्यांना पोलीस दलातील अत्याधुनिक शस्त्रसामग्री, उपकरणे आणि तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पोलीस दलातील जबाबदाऱ्या आणि संधींबाबत उत्सुकता निर्माण झाली. विद्यार्थ्यांना बीडीएस विभागातील प्रकाश महाजन, नरेंद्र ठाकूर, आशिफ पिंजारी, पंकज सोनवणे, रामदास साळुंखे, राखीव पोलीस दलातील आशिष चौधरी, दीपक पाटील, संतोष सुरवाडे, सुभाष धिरबस्सी, अजित तडवी यांच्यासह क्युआरटी टीम, आरसी प्लाटुन नं.७ मधील कर्मचाऱ्यांनी शस्त्रांविषयी माहिती समजून सांगितली. पोलीस बँड पथकाने विशेष सादरीकरण यावेळी केले.
डॉ. महेश्वर रेड्डी म्हणाले,”पोलिस दलातील सेवा ही केवळ नोकरी नाही, ती समाजसेवेचे एक मोठे साधन आहे. विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहून यासाठी स्वतःला तयार करावे.” मोबाईलच्या अतिवापरापासून सावध राहण्याचा सल्लाही त्यांनी दिला. विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या अतिवापरापासून स्वतःला दूर ठेवावे, तसेच सायबर फसवणूक टाळण्यासाठी सतर्क राहावे, असे आवाहनही त्यांनी केले. “खोट्या कॉल्सना बळी पडू नका,” असेही त्यांनी स्पष्ट केले. चित्रपटांमधून पोलिसांविषयी जी चुकीची प्रतिमा निर्माण होते, ती बदलण्याचे आवाहन करताना डॉ. महेश्वर रेड्डी म्हणाले, पोलिसांचे खरे काम काय आहे, हे समजून घ्या. पोलिस दल समाजासाठी एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे.
संदीप कुमार गावित व अशोक नखाते यांनीही मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी छोटा पोलीस होऊन मुलांनी पालकांना वाहतुकीचे नियम पाळण्याचे भावनिक आवाहन केले. विराज कावडिया यांनी उपक्रमाविषयी युवाशक्ती व भवरलाल अॅण्ड कांताबाई फाऊंडेशन यांची भूमिका विशद केली. अरविंद वानखेडे यांनी सायबर क्राईम यावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पोलीस व शहर वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक राहूल गायकवाड यांनी आभार मानले. सुत्रसंचालन वायरलेस विभागातील अमित माळी यांनी केले. शहर वाहतुक पोलीस दलातील मेघना जोशी, शितल पाटील, वैशाली बाविस्कर, युवाशक्ती फाऊंडेशनचे प्रितम शिंदे, सौरभ कुलकर्णी, योगेश कोळी, केवलनाथ, ओम खाचणे, अंजिक्य सपकाळे, रोहन कोळी, मंदार फालक यांनी यशस्वितेसाठी सहकार्य केले.
या शाळांच्या विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग – नुतन मराठा, नंदिनीबाई बेंडाळे विद्यालय, मू.जे. महाविद्यालय, ला.ना. शाळा मधील एनसीसीचे विद्यार्थी, का.ऊ. कोल्हे महाविद्यालय, भगिरथ स्कूल, ओरियन सीबीएससी व स्टेट बोर्ड, प्रगती स्कूल, पुष्पावती खुशाल गुळवे विद्यालय, न्यु इंग्लीश स्कूल, विद्या इंग्लिश मिडीयम, मनपा शाळा नं. १० ऊर्दू स्कूल, विवेकानंद स्कूल या शाळांसह सुमारे ७००० विद्यार्थ्यांनी दिवसभरात प्रदर्शनीला भेट दिली.
हेल्मेट जनजागृतीसाठी रॅली – जिल्हा पोलीस दलातर्फे हेल्मेट जनजागृतीसाठी रॅली काढण्यात आली. यामध्ये जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.मधील सहकाऱ्यांनी सहभाग घेतला. शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी मोटार सायकल रॅली ला हिरवी झेंडी दाखविली. पोलीस अधिक्षक कार्यालय परिसरातून निघालेली मोटार सायकल रॅली नेहरू चौक, टॉवर चौक, चित्रा चौक, नेरी नाका, अंजिठा चौफुली, ईच्छादेवी चौक, आकाशवाणी चौक, स्वातंत्र्य चौक मार्ग पोलीस मुख्यालय येथे समारोप झाला. हेल्मेट परिधान करून आमदार सुरेश भोळे, पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी सह अधिकाऱ्यांनी सहभाग घेऊन हेल्मेट वापरा विषयी मोटार सायकल रॅलीतून जनजागृती केली.