जैन हिल्स येथे दोन दिवसांची ‘राष्ट्रीय मसाला परिषद’ सुरू

जळगाव दि.१८ (प्रतिनिधी) – ‘मसाले व सुगंधी वनस्पती पिकांसाठी शेतकऱ्यांना सुयोग्य मशागतीची पद्धती आणि गुणवत्तेची रोपे उपलब्ध करून दिले तर या क्षेत्रात खूप मोठी प्रगती होऊ शकते. जैन इरिगेशनने याबाबतचे केलेले कार्य वाखाणण्याजोगे आहे असे मोलाचे विचार प्रमुख पाहुणे डॉ संजय कुमार यांनी व्यक्त केले. १८ व १९ जानेवारी रोजी जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. आणि जैन फार्मफ्रेश फूड्स लि., कॉन्फेडरेशन ऑफ हॉर्टीकल्चर असोसिएशन ऑफ इंडिया (CHAI), यांच्या संयुक्त विद्यमाने (मसाले व सुगंधी पिकांच्या मूल्यवर्धित साखळी व्यवस्थापन) ‘राष्ट्रीय मसाले परिषद २०२५’ जैन हिल्स येथे आयोजली आहे त्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. 

यावेळी व्यासपीठावर जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, अतुल जैन, आयआयएसआर केरलाचे माजी संचालक डॉ. निर्मल बाबू, ग्लोबल एग्रीकल्चरल कन्सल्टंट सिइओ (इस्त्राईल) याइर इशेल, वर्ल्ड स्पाइस ऑर्गनायझेशनचे चेअरमन राजकुमार मेनन, भारत सरकारचे फलोद्यान आयुक्त डॉ. प्रभात कुमार, डॉ. संजय कुमार (चेअरमन, एएसआरबी, नवी दिल्ली), डॉ. मेजर सिंग (सदस्य, एएसआरबी, नवी दिल्ली), डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोल्याचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, वायएसआर अॅग्रिकल्चर विद्यापीठ आंध्रप्रदेशनचे कुलगुरू डॉ. गोपाल के. आदी उपस्थित होते. तसेच मसाले पीक घेणारे जिल्ह्यातील शेतकरी, संशोधक, तंत्रज्ञ, अभ्यासक यांचीही उपस्थिती होती.

आरंभी मान्यवरांच्याहस्ते दीप प्रज्ज्वलन झाले. जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी स्वागतपर सुसंवाद साधला. ते म्हणाले की, जगाच्या खाण्या-पिण्याच्या पद्धतीमध्ये बदल होत आहे. त्यामुळे जगात मसाले पदार्थांना मागणी वाढलेली आहे. मसाले हे अन्नपदार्थांना चविष्ठ बनवतात, शिवाय त्यांच्यात औषधी गुणधर्म देखील आहेत. शेतकरी, सरकार, संशोधन संस्था, खासगी कंपन्या, मसाल्यांवर काम करणाऱ्या समुहास या क्षेत्रात काम करण्याची खूप मोठी संधी असल्याचे सांगून मिरी या पिकात भारत जगामध्ये अग्रणी बनू शकतो असे मत अतुल जैन यांनी व्यक्त केले. मसाले उद्योगाबाबत सरकारकडे ध्येय धोरणे ठरविताना विचार व्हावा. जैन इरिगेशने ही राष्ट्रीय मसाले परिषद आयोजित करून एकाच व्यासपीठावर सगळ्यांना आणलेले आहे. शेतकऱ्यांचे उत्पादन वाढीसाठी सिंचन, फर्टिगेशन इत्यादी तंत्रज्ञान कंपनीने उपलब्ध करून दिले आहे. नावीण्यपूर्ण असे मसाल्याचे पीक शेतकऱ्यांनी घ्यावे असे आवाहन केले.

डॉ संजय कुमार भाषणात म्हणाले की, नवीन तंत्रज्ञानामुळे मसाले पिकांच्या पद्धतीत चेहरामोहरा बदलला. मसाल्याच्या पिकांसंदर्भात आजही प्रतवारी आणि लेबलिंग केली जात नाही. पीक कोणत्या शेतातून आपल्यापर्यंत पोहोचले याची माहिती ग्राहकांना उपलब्ध नसते. मिरची आणि जिरे उत्पादनात भारत पुढे असला तरी इतर मसाल्याच्या पिकांमध्ये भारत मागेच आहे तो पुढे कसा येईल उत्पादकता कशी वाढेल याबाबत विचार करणे व त्याबद्दल प्रत्यक्ष कृती करण्याची आवश्यकता आहे. सुगंधी वनस्पतींच्या जाती विकसीत करून त्यात मधमाश्यांचे पालन केले तर शेतकऱ्यांना मध निर्मितीतून अधिकचे पैसे मिळविता येतील. याच प्रमाणे हिंग, केसर आणि ऑरिगॅनोची शेती करून नवे क्षेत्र आणि नवी बाजारपेठ निर्माण करायला हवी असे आवाहन संजय कुमार यांनी केले.

मसाले परिषद आयोजनात ज्यांची महत्त्वाची भूमिका राहिली ते डॉ. निर्मल बाबु यांनी ही परिषद आयोजन करण्यामागची पार्श्वभूमी भाषणातून सांगितली. बाजारपेठेत स्पर्धा करायची असेल तर उत्तम गुणवत्तेचा माल असणे आवश्यक आहे परंतु दुर्दैवाने या क्षेत्रात आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता व गुणवत्ता राखली जात नाही याबाबत चिंता व्यक्त केली. पुढील पाच वर्षाच्या काळात आज भारतातून मसाले पदार्थांची जितकी निर्यात होते त्याच्या दुप्पट उद्दिष्ट साध्य करायचे आहे. जगात मसाले निर्यातीच्या क्षेत्रात भारतास उत्तम संधी असल्याचे सांगून शेतकऱ्यांनी या मिळालेल्या संधीचे नक्कीच सोने करून घ्यावे असे आवाहन केले. 

मसाले पदार्थांचे उल्लेख बायबल मध्ये देखील उल्लेख आढळतो. पाच हजार वर्षांपूर्वी शेती, अन्न, शेती करण्याच्या पद्धती लोकांना ठाऊक होत्या. जगभरातील व्यक्ती अनेक मसाल्याचे पदार्थ वापरतात. मसाल्यांना जगभर मागणी असल्याने या क्षेत्रात खूप मोठी संधी असल्याचे इस्त्राईलचे लसूण पैदासकार म्हणून ख्याती असलेल्या डॉ. एअरशेल यांनी सांगितले. 

मसाले उद्यागात अनेक आव्हाने आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी जगभरातील मसाला उद्योजकांनी एकाच व्यासपीठावर येण्याची आवश्यकता राजकुमार मेनन यांनी सांगितली. यासाठी एफपीबी आणि शेतकरी यांनी मिळून काम केले तर ५० हजार हून अधिक शेतकरी जुळू शकतील अशी आशा ही व्यक्त केली.

छोटे शेतकरी हे तोट्याचे नव्हे तर फायद्याचे ठरू शकतात. चांगल्या व्हरायटीचे पिके घेतले, मल्टिक्रॉपींग पद्धती हा चांगला उपाय ठरू शकतो. चांगल्या पद्धतीने शेती केली तर मसाल्याची शेती फायद्याची ठरू शकते असे डॉ. प्रभात कुमार म्हणाले. भारत देश मोठ्या प्रमाणात हिंग आयात करतो त्यासाठी काश्मीर, हिमाचल, उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणात हिंगाची शेती होऊ शकते या सोबत केशराची शेती देखील करता येऊ शकते.

राष्ट्रीय पातळीवरील मसाले विषयावरील परिषद घेऊन दोन दिवसांचे विचार मंथन घडून येईल, त्याबद्दल जैन इरिगेशनचे विशेष आभार व्यक्त करून मिरची, हळद, आले, मीरी इत्यादीमध्ये चांगले काम करण्याची संधी आहे. या सोबतच लेमनग्रास, सॅण्डलवूड ऑईल असे प्रक्रिया उद्योग शेतकरी उभारू शकतात. त्यासाठी वायगाव हळदीचे उदाहरण सांगितले. येथील हळदीला जिओटॅग मिळाला असून बाबा रामदेव यांच्या उद्योगासाठी बुलडाणा जिल्ह्यातील जानेफळ हे गाव तेथील पद्धती निर्माण झाली आहे असे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी सांगितले.  

मसाले म्हणजे कल्चर हेरिटेज आहे तसेच अर्थकारणामध्ये देखील अत्यंत मोलाची भूमिका बजावते. शेतकऱ्यांनी समूह शेतीचा प्रयोग करून आर्थिक दृष्टीने सक्षमतेकडे वाटचाल करावी असे डॉ. गोपाल म्हणाले. आले. हिरवी मिरची, हळद इत्यादी वाळल्यानंतर मसाले म्हणून अंतर्भाव होतो. अशी संभ्रम अवस्था नसावी याबाबत डॉ. मेजर सिंग म्हणाले.  यावेळी व्यासपीठाच्या मान्यवरांच्याहस्ते ‘ज्ञानमंथन – २५’ आणि ‘स्पाईसेस हॅण्डबुक’ अशा दोन पुस्तकांचे प्रकाशन झाले.  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुब्रह्मण्यम आणि डॉ. मोनिका भावसार यांनी तर आभारप्रदर्शन गोपाल लाल यांनी केले. या उद्घाटन सत्रानंतर दिवसभर तांत्रिक चर्चासत्रे झाली. उद्या रविवारी १९ रोजी या राष्ट्रीय मसाला परिषदेचा समारोप होईल. 

मसाले पिकाच्या जागतिक स्तरावरील व्यापारास पाच हजार वर्षांपूर्वी सुरवात झाली. अमेरिका, ब्राझील, लंडन व भारत यामध्ये व्यापाराची कशी साखळी निर्माण होत गेली आणि भारत जगाच्या पाठीवर मसाले उत्पादक देश म्हणून नावा रुपाला आला हे सांगितले. परंतु भविष्यात मोठ्या संधी आहे जर उत्पादकांनी जमिनीचे आरोग्य, फवारणीचे वेळापत्रक व सेंद्रिय पद्धतीने उत्पादन हे जाणीवपूर्वक करणे गरजेचे आहे असे जैन फार्मफ्रेशचे मुख्य व्यवस्थापक सुवन शर्मा (लंडन) यांनी मांडले.

या परिषदेमध्ये डॉ. के.बी. पाटील, डॉ. जितेंद्र कदम, डॉ. अभेगौडा, डॉ. बी.के., माजी कुलगुरू डॉ. टी. जानकिरामन, डॉ. मनिष दास, डॉ. विजय महाजन, डॉ. विजयन, डॉ. पी.के. गुप्ता, डॉ. बशीर, डॉ. अब्बास, डॉ. वेणुगोपाल, डॉ. ज्ञानेश्वर पाटील, डॉ. विकास बोरोले, हे उपस्थित होते. परिषदेच्या यशस्वीतेसाठी डॉ. अनिल ढाके, डॉ.बी.के, डॉ. के.बी. पाटील, डॉ. सुमेरसिंग, योगेश पटेल, राहुल भारंबे, गोविंद पाटील आणि मोहन चौधरी यांनी विशेष परिश्रम घेतले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here