जीम ट्रेनर अफाफचा खून झाला लोखंडी रॉडने — बदल्यात तेहरीम ठार झाला बंदुकीच्या गोळीने

जळगाव (क्राईम दुनिया न्यूज नेटवर्क): अफाफ अख्तर पटेल हा तिस वर्ष वयाचा शरीरसौष्ठव पटू भुसावळ शहरातील खडका रोड परिसरात रहात होता. भुसावळ शहरातील एक जीममधे तो जीम ट्रेनर म्हणून काम करत होता. जीममधील तरुणांना त्यांचे शरीर पिळदार करण्यासाठी तो योग्य ती ट्रेनिंग देत असे. फेब्रुवारी 2023 चा तो काळ होता. या कालावधीत तो रहात असलेल्या खडका रोड परिसरातील काही तरुणांसोबत त्याचा व्यावसायिक वाद झाला होता. तेहरीम नासीर शेख, तोहिद नासीर शेख, उबेद शेख, शेख मुजम्मिल शेख फरीद, शेख अक्रम शेख सबदर, उबेद शेख अक्रम शेख आणि नावीद शेख नासीर असे ते तरुण होते. या सर्व तरुणांसोबत अफाफ पटेल या जीम ट्रेनरचा वाद होता. या वादामुळे गुंड प्रवृत्तीचे सर्व तरुण अफाफ पटेल याच्यावर चिडून होते.

शेख बिस्मिल्ला शेख रहीम हे अफाफ पटेल याचे नातेवाईक होते. अफाफ पटेल याचे नातेवाईक शेख बिस्मिल्ला यांच्यासह  काही नातेवाईकांवर लोखंडी रॉड व तलवारीने हल्ला झाला होता. या प्राणघातक हल्ल्यातील जखमींना डॉ. उल्हास पाटील रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. जखमी नातेवाईकांना बघण्यासाठी अफाफ पटेल रुग्णालयात गेला असता त्या ठिकाणी त्याचे इतर परिचीत नातेवाईक आणि वार्डातील नगरसेवक शफी पहेलवान असे सर्वजण हजर होते. यावेळी जखमी नातेवाईकांसह अफाफ पटेल याने नगरसेवक शफी पहेलवान यांना विचारले की तुम्ही नगरसेवक म्हणून हजर असतांना टोळक्याची आमच्या नातेवाईकांवर प्राणघातक हल्ला करण्याची हिम्मत कशी काय झाली? माझ्या नातेवाईकांना एवढ्या कृरपणे मारहाण कशी काय झाली असा सवाल अफाफ पटेल याने नगरसेवक शफी पहेलवान यांना केला. त्यावेळी त्याठिकाणी शेख मुजम्मील शेख फरीद हा हजर होता. शेख मुजम्मील याच्यासह त्याच्या काही नातेवाईकांनी अफाफ पटेल याच्यावर हल्ला चढवला. मात्र शफी पहेलवान यांनी मध्यस्ती करत रुग्णालय परिसरातील वाद मिटवला. या टोळक्याचा जीम ट्रेनर अफाफ पटेल याच्यावर व्यावसायीक वादातून मोठ्या प्रमाणात राग कायम होता.

आपसी हल्ला आणि या वादाच्या तक्रारी त्यावेळी विविध पोलिस स्टेशनला दाखल झाल्या होत्या. दोन गटातील हा वाद अधुनमधून उफाळून येत होता. रस्त्याने जाता येताना तेहरीम नासीर शेख, तोहिद नासीर शेख हे अफाफ पटेल यास वारंवार बघून घेण्याच्या धमक्या देत शिवीगाळ करत होते. सर्वजण गुंड प्रवृत्तीचे असल्यामुळे शरीरसौष्ठवपटू असला तरी अफाफ पटेल पोलिस स्टेशनला त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यास जात नव्हता.

जीम ट्रेनर अफाफ पटेल याचा भाऊ वसीम मजीद पटेल याने भुसावळ रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म वर कॅन्टीन स्टॉल चालवण्यास घेतला होता. तो स्टॉल वसीम पटेल याला मिळू नये म्हणून कलीम उंद्री व  शरीफ उंद्री या दोघांनी वाद घातला होता. एकंदरीत गुंड प्रवृत्तीच्या टोळक्याने जीम ट्रेनर अफाफ पटेल यास जेरीस आणले होते.  तो कुठे जातो? काय करतो? याच्या मागावर त्याचे सर्व गुंड प्रवृत्तीचे विरोधक रहात होते.

जीम ट्रेनर अफाफ पटेल हा दररोज सायंकाळी सहा ते नऊ या कालावधीत कॅरम खेळण्यासाठी खडका रोड परिसरातील अलिया कोल्ड्रिंक्स या ठिकाणी जात होता. 4 फेब्रुवारी 2023 रोजी अफाफ पटेल चार वाजता कॅरम खेळण्यासाठी अलिया कोल्डींक्स या ठिकाणी आला. तो खरोखर कॅरम खेळण्यासाठी आला आहे की नाही याची खात्री करण्यासाठी दोघे जण हेरगिरी करुन गेले. अफाफ पटेल कॅरम खेळत असतांना रात्री नऊ वाजेच्या सुमारास त्याठिकाणी रोमान शेख शकील शेख, तेहरीन नासीर शेख, शेख समीर शेख फिरोज असे सर्वजण हातात लाठया व रॉड घेवुन अफाफवर हल्ला करण्याच्या उद्देशाने आले.

आपल्यावर प्राणघातक हल्ला होणार याची खात्री पटताच अफाफ पटेल हा तेथून जीव वाचवण्यासाठी पळाला. मात्र हल्लेखोरांनी काळ बनून त्याचा पाठलाग केला. त्याला लाठ्या काठ्यांनी मारहाण करण्यात आली. तेहरीम शेख याने त्याच्या  हातातील लोखंडी रॉड अफाफ याच्या अंगावर घातला. बचाव करण्यासाठी अफाफने त्याचा डावा हात उचलला. मात्र तो रॉड त्याच्या बोटांना लागला. पुढच्याच क्षणी तेहरीम शेख याने त्याच्या हातातील रॉड अफाफच्या डोक्यावर उगारला. तो हल्ला देखील परतवून लावण्यासाठी अफाफने डावा हात वर केला. त्यामुळे तो रॉड अफाफच्या डाव्या हाताच्या कोपरावर लागला. त्यात अफाफ जबर जखमी झाला.

“हमारेको भाई बोला कर अबसे, नही तो जानसे मार देंगे” अशी धमकी शेख समीर शेख फिरोज याने ओरडून अफाफला दिली. तेहरीन शेख याच्यासोबत असलेल्या सर्वांनी जखमी अफाफला अतिशय खालच्या दर्जाच्या शिव्या देत तेथून पलायन केले. मात्र जाता जाता त्यांनी  “तेरे भाई वसीम पटेलको बोल, कलीम उंद्री और शरीफ उंद्री के नांदमे नही लगनेका, नही तो जानसे मार डालेंगे” अशी धमकी अफाफला दिली. जखमी अफाफला त्याचा मेहुणा शेख जोएब शेख जाफर याने त्याचा मित्र सद्दाम शेख अकबर, इम्रान शेख पप्पु शिकारी, रफिकभाई आदींच्या  मदतीने डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अती दक्षता विभागात उपचारादरम्यान अफाफ पटेल याने दिलेल्या जवाबानुसार प्राणघातक हल्ल्या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला रोमान शेख शकील शेख, तेहरीम नासीर शेख, शेख समीर शेख फिरोज, लतीफ तडवी या हल्लेखोरांसह त्यांना मदत करणा-या दानिश शेख फरीद शेख, शेख उबेद शेख अक्रम, मुजम्मिल शेख फरीद, तोहिद शेख नासीर शेख, अबुजर शेख बशीर, मुस्तफा शाह युनुस शाह, नासीर सन्नाटा तसेच इम्मु कोलरीया, कल्लु तडवी व अक्रम शेख सबदर शेख या सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. कलीम उंद्री व शरीफ उंद्री यांनी जीवे ठार मारण्याचा कट रचल्याचा आरोप करण्यात आला. वैद्यकीय उपचारादरम्यान अफाफ पटेल याचा मृत्यु झाला. त्याची मृत्युसोबतची झुंज संपली. त्यामुळे या गुन्ह्यात खूनाचे कलम वाढवण्यात आले.

या प्राणघातक खूनी हल्ल्यात तेहरीम नासीर शेख याचा प्रमुख रोल होता. त्यानेच लोखंडी रॉडने अफाफवर प्राणघातक हल्ला चढवला होता. अफाफच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या तेहरीम शेख याचा बदला घेण्याचे अदनान उर्फ काल्या शेख युनुस याने मनाशी ठरवले होते. मित्राच्या खूनाचा बदला घेण्यासाठी अदनान याने बदल्याचे टास्क पुर्ण करण्यासाठी हातावर मयत अफाफ याचा टॅटू गोंदवून घेतला. तो टॅटू बघून त्याला अफाफच्या मृत्यूचा बदला घेण्याची कायम आठवण रहात होती.

अखेर दोन वर्षांनी 10 जानेवारी 2025 अफाफच्या खूनाचा बदला घेण्याचा तो दिवस जवळ आला. या दिवशी तेहरीमच्या  जीवनातील सकाळची शेवटची नमाज आणि सकाळच्या शेवटच्या चहाचा घोट नियतीने लिहून ठेवला होता. सकाळी साडे सहा वाजता तेहरिम अहमद नासिर याच्यासह चिक्की विक्रेता जाकीर मेहबुब खान, अहमद शेख, अब्बास खान निसार खान, जहाँगिर खान अन्वर खान असे सर्वजण मच्छीवाडयातील मशिदीत नमाज पठन करण्यासाठी गेले. नमाज पठण सकाळी सात वाजता पुर्ण झाले. त्यानंतर तेहरीम याच्यासह सर्वजण चहा पिण्यासाठी जाम मोहल्यातील शालीमार हॉटेल समोर असलेल्या डी.डी. सुपर कोल्ड्रीक्स अ‍ॅण्ड टी हाऊस या दुकानावर सव्वा सात वाजता एकत्र आले. चहा पित असतांना त्याठिकाणी एका पाठोपाठ एक असे तन्वीर माजिद पटेल, अनवर पटेल, रमिज पटेल, शेख साहिल शेख रशिद असे चौघे जण त्याठिकाणी अचानक येऊन धडकले.

बंदुका घेऊन आलेल्या सर्वांनी घाणेरड्या शिव्या देत बाहर निकलो असा इशारा दिला. तन्वीर माजिद पटेल याने तेहरिम अहमद यास त्याच्या समोर उभा राहून “साले तुने हमारे भाई को पिछले साल मारा था, अब तेरा खेल खत्म” असे म्हणत त्याच्या दिशेने बंदुकीतील गोळी झाडली. ती गोळी तेहरिम अहमद याच्या उजव्या कानाच्या खाली मानेला स्पर्श करुन गेली. गोळीचा आवाज ऐकताच दुकानात चहा पिण्यासाठी आलेले इतर ग्राहक घाबरुन क्षणार्धात पळापळ करत पसार झाले. चहाच्या हॉटेलमधे आलेल्या चौघांनी तेहरीम याच्यावर गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी तेहरिम अहमद याच्या उजव्या बाजुला मानेवर लागली. एक गोळी डोक्याच्या मागे लागली. या गोळीबारीत तेहरीम गंभीर जखमी झाला.

त्यानंतर आलेले चौघे जण त्यांच्या कब्जातील बंदुका घेत रुबाबात हॉटेलमधून बाहेर पडू लागले. मात्र बाहेर निघत असतांना “सालो हमारे बारे में किसीने किसीको बोला तो इसके जैसा तुम्हारको मार डालेंगे” अशी धमकी देण्यास विसरले नाही. बाहेर आलेले अनवर पटेल व शेख साहिल शेख रशिद हे दोघे जण एका मोटर सायकलवर बसुन रेल्वेस्टेशनच्या दिशेने निघून गेले. तन्वीर माजिद पटेल व रमिज पटेल असे दोघे जण दुस- या मोटर सायकलवर बसुन गोल्डन लॉजच्या रस्त्याने शिवाजीनगरच्या दिशेने निघून गेले.

यावेळी घाबरुन पळून गेलेला चिक्की विक्रेता जाकीर मेहबुब खान याच्यासह अब्बास खान निसार खान, जहाँगिर खान अन्वर खान असे सर्वजण पुन्हा घटनास्थळी हॉटेलमधे आले. त्याठिकाणी तेहरीम हा जखमी अवस्थेत पडलेला होता. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जखमी तेहरीम अहमद याचे वडील नासिर शेख, बहिण तबस्सुमबी व भाऊ नविद शेख असे तिघे जण त्याठिकाणी आले. सर्वांनी मिळून जखमी तेहरीम यास रिक्षाने आठवडे बाजार परिसरातील एका खासगी दवाखान्यात नेले. मात्र त्यापुर्वीच तेहरीम याची प्राणज्योत मालवली होती. खासगी दवाखान्यातील डॉक्टरांनी तेहरीम यास तपासून मयत घोषित केले. तेथील डॉक्टरांनी त्याला ट्रामा केअर सेंटरमधे घेऊन जाण्याचा सल्ला दिला.  

ट्रामा केअर सेंटर मधील डॉक्टरांनी देखील त्याला तपासून मयत घोषित केले. त्यांनी त्याला जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे पोस्टमॉर्टम कामी नेण्याचा सल्ला दिला. अखेर दोघा जणांनी त्याचा मृतदेह शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयात नेला. दरम्यानच्या कालावधीत मयत तेहरीम याचे वडील नासीर अहमद आणि जाकीर खान असे दोघे जण बाजारपेठ पोलिस स्टेशनला तक्रार देण्यासाठी हजर झाले. दरम्यानच्या कालावधीत चर्चेदरम्यान त्यांना समजले की तेहरीम याचा खून अदनान उर्फ काल्या शेख युनुस आणि मजीद पटेल या दोघांनी संगनमताने कट रचून चौघांच्या मदतीने केला आहे. जाकीर खान याने दिलेल्या फिर्यादीनुसार भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला तेहरीम याच्या खून प्रकरणी तन्वीर माजिद पटेल, अनवर पटेल, रमिज पटेल, शेख साहिल शेख रशिद, मजिद पटेल व अदनान उर्फ काल्या शेख युनुस या सहा जणांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. गु.र.नं. 14/2025 भारतीय न्याय संहिता कलम 103(1), 61(2), 351(2), 351(3), 352, 3(5) सह शस्त्र अधिनियम कलम 3/25 नुसार 10 जानेवारी 2025 रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुन्ह्याचा पुढील तपास भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांनी आपल्या सहका-यांच्या मदतीने सुरु केला. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेने देखील सुरु केला. या गुन्ह्यातील फरार संशयीत आरोपी सलमान अब्दुल मजीद पटेल उर्फ रमीज पटेल यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बल्लारशाह जिल्हा चंद्रपुर येथून ताब्यात घेत अटक केली. या शोध कामी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उप निरीक्षक शरद बागल, पोहेकॉ कमलाकर बागुल, पोहेकॉ गोपाल गव्हाळे, पोहेकॉ संघपाल तायडे, चालक पोहेकॉ सोमवंशी, पोकॉ सचीन पोळ आदींनी सहभाग घेतला.

भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राहुल तुकाराम वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्या पथकाने अदनान शेख युनुस, शेख साहील शेख रशीद, अब्दुल नबी हनीफ पटेल, सनीस नाइन मोहमद आसीफ अशा चौघांना मनमाड परिसरातून तपासाअंती शिताफीने ताब्यात घेत अटक केली. या पथकातील सहायक पोलिस निरीक्षक गणेश धुमाळ, सहायक पोलिस निरीक्षक अमितकुमार बागुल, पोलिस उप निरीक्षक मंगेश जाधव, पोलिस उप निरीक्षक राजु सांगळे, पोलिस उप निरीक्षक  मंगेश बेंडकोळी, पोहेकॉ विजय नेरकर, पोहेकॉ रमण सुरळकर, पोहेकॉ उमाकांत पाटील, पोहेकॉ महेश चौधरी, पोहेकॉ अनवर शेख, पोहेकॉ निलेश चौधरी, पोलिस नाईक अतुल पवार, पोलिस नाईक सोपान पाटील, पोकॉ प्रशांत परदेशी, जावेद शहा, भुषण चौधरी, योगेश माळी, राहुल वानखेडे, हर्षल महाजन आदींनी या तपासकामी सहभाग घेतला. त्यांच्या कब्जातून चार गावठी पिस्टल, तिन पितळी धातुचे जिवंत काडतुस व एक पितळी धातूची काडतुसाची रिकामी पुंगळी असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सुरुवातीला सर्व संशयितांना पोलिस कोठडी व नंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

भुसावळ शहरात ‘खून का बदला खून’ ची मालिका सुरुच असून अशा बदल्याच्या भावनेतून वाढत जाणा-या गुन्हेगारीला आळा बसावा असे या घटनांच्या निमित्ताने म्हटले जात आहे. 13 जुलै 2015 रोजी जामनेर रोडवरील वाल्मीक चौकात मोहन बारसे यांची हत्या झाली. त्यानंतर 13 जानेवारी 2016 रोजी मोहन बारसे खून प्रकरणातील संशयित आरोपी नट्टू चावरिया आणि गोपाळ शिंदे यांच्यावर बसमध्ये बदल्याच्या भावनेतून गोळीबार झाला होता. त्यात नट्टू चावरियाचा मृत्यू झाला होता. 9 ऑगस्ट 2017 रोजी मोहन ब बारसे हत्याकांडातील आरोपी जॅकी ऊर्फ जगदीश पथरोडची भोपाळमध्ये हत्या झाली होती. मोहन बारसे खून प्रकरणातील संशयित आरोपीची बदल्याच्या भावनेतून ही दुसरी हत्या होती. 4 फेब्रुवारी 2023 रोजी शरीरसौष्ठवपटू अफाफ पटेल याचा खून झाला होता. या प्रकरणात एकुण सोळा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. यातील तेहरीमचा या गोळीबारीच्या घटनेत मृत्यू झाला आहे. दि. 23 ऑक्टोबर 2023 रोजी दिलीप रामलाल जोनवाल यांची निर्घृण हत्या झाली होती. सन 1999 मधील वडिलांच्या खूनाच्या घटनेचा बदला म्हणून आदिल खाटीक याने ही हत्या केली होती. दि. 29 मे 2024 रोजी जळगाव रोडवर पूर्ववैमनस्यातून हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार करत माजी नगरसेवक संतोष बारसे, सुनील राखुंडे या दोन्ही मित्रांचा एकाचवेळी खून केला होता. भुसावळ शहरातील गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढत असल्याचे देखील या घटनांच्या निमित्ताने म्हटले जात आहे. भुसावळ येथील गुन्हेगारीला राजकीय वरदहस्त असल्याचे देखील म्हटले जाते. राजकीय वरदहस्त असल्यामुळे आपले कुणीच काही वाकडे करु शकत नाही अशी गुन्हेगारांच्या मनात भावना निर्माण झाली असल्याचे बोलले जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here