जळगाव : एक हजार रुपयांची लाच स्विकारणा-या पिंपळकोठा ता. एरंडोल येथील प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांसह त्या लाचेस कारणीभूत असलेल्या शिक्षण विस्त्तार अधिका-याविरुद्ध एरंडोल पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बळीराम सुभाष सोनवणे असे मुख्याध्यापकाचे तर जे.डी.पाटील असे शिक्षण विस्तार अधिका-याचे नाव आहे.
पिंपळकोठा ता. एरंडोल येथील प्राथमिक शाळेचे इंस्पेक्शन जे.डी. पाटील यांनी काही दिवसांपुर्की केले होते. शिक्षण विस्तार अधिका-यांकडून शाळा तपासणीचा चांगला शेरा मिळण्यासाठी त्यांना दहा हजाराची रक्कम शिक्षकांकडून जमा करुन द्यायची होती. त्यासाठी प्रत्येक शिक्षकाकडून एक हजाराची रक्कम जमा करण्याचा निर्णय मुख्याध्यापकांनी केला होता.
त्यातील दोन शिक्षकांकडे मिळून दोन हजार रुपयांची रक्कम बाकी होती. त्यापैकी एका शिक्षकाने जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार केली होती. त्या तक्रारीच्या आधारे जळगाव एसीबी कार्यालयाने केलेल्या पडताळणी अंती कारवाई करण्यात आली. जळगाव एसीबीचे पोलिस उप अधिक्षक योगेश ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार सुरेश पाटील, चालक पो.ना. बाळू मराठे, पोकॉ राकेश दुसाने आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.