गांधी रिसर्च फाऊंडेशनची ग्राम संवाद सायकल यात्रा

On: January 28, 2025 11:06 PM

जळगाव – येथील गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने (हुतात्मा दिनी) दरवर्षीप्रमाणे ग्राम संवाद सायकल यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. गांधी विचारांचा प्रचार-प्रसाराच्या उद्देशाने दि. ३० जानेवारी ते १० फेब्रुवारी २५ दरम्यान निघणाऱ्या १२ दिवसीय सायकल यात्रेस जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हिरवी झेंडी दाखविणार असून जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., चे अध्यक्ष व गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक अशोकभाऊ जैन यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.

ग्राम संवाद सायकल यात्रा यावर्षी जळगाव जिल्ह्याच्या उत्तर भागातील जळगाव, यावल, चोपडा तालुक्यातून जवळपास ५० गावांना भेटी देणार असून सुमारे ३०० किमीचा प्रवास करणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून एक लाख विद्यार्थी, युवक, महिला व नागरिकांशी संवाद साधण्यात येणार आहे. या सायकल यात्रेत फ्रांस, नेपाळ देशांसह भारतातील विविध राज्यातील व स्थानिक अशा ४० स्वयंसेवकांचा सहभाग आहे.

चारित्र्य निर्माणासह महिलांसाठी विशेष कार्यक्रम – यात्रेदरम्यान विविध शाळा महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांसाठी सापशिडी, मूल्य संवर्धनाचे खेळ, प्रश्नमंजुषा, कठपुतली खेळ या माध्यमातून चारित्र्य निर्माणाचे कार्य करणार आहे. तसेच ६ वेगवेगळया ठिकाणी महिलांसाठी विशेष कार्यक्रमाचे तर नागरिकांसाठी दररोज पथनाट्याद्वारे प्रबोधन कार्यक्रम करण्यात येणार आहे. यात्रेत दररोज दोन कार्यक्रम शाळा / महाविद्यालयात तर रात्री मुक्कामाच्या ठिकाणी जाहीर कार्यक्रम होणार आहे. भारतीय स्वातंत्र्यावरील प्रदर्शनी कार्यक्रमांच्या ठिकाणी लावण्यात येणार आहे. स्वस्थ व्यक्ती… स्वस्थ समाज या संकल्पनेनुसार निरोगी व सशक्त समाजाच्या निर्मितीच्या उद्देशाने या यात्रेत प्रबोधन करण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमांची सांगता भारताच्या प्रतिज्ञेने होणार आहे. विद्यार्थी व नागरिकांनी सहभाग देऊन सहकार्य करावे असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment