जळके येथे टोमॅटो पीक परिसंवादात तज्ज्ञांचे मार्गदर्शन

oplus_2

जळगाव, दि. १ (प्रतिनिधी) –  कागोमी टोमॅटोचे वाण शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचे आहेत.  जैन इरिगेशन आणि कागोमी कंपनी ४ वर्षांपासून संयुक्तपणे शेतकऱ्यांसाठी काम करत आले आहे. शेतकऱ्यांच्या हाती दोन पैसे मिळावे हीच तळमळ प्रत्येक सहकाऱ्याची आहे. टोमॅटो करार शेती उपक्रमात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन  कागोमीचे भारतातील प्रमुख मिलन चौधरी यांनी केले. जैन फार्म फ्रेश फूड्स लिमिटेड आणि कागोमे इंडिया प्रायव्हेट लिमिटेड व जळके येथील गजानन ठिबक यांच्या संयुक्त विद्यमाने टोमॅटो पीक  परिसंवाद आयोजला होता त्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर तालुका कृषी अधिकारी शरद पाटील, कृषी मंडल अधिकारी मिलिंद वाल्हे, कागोमीचे सहकारी संदीप जाधव, मनोहर देसले, जैन इरिगेशनचे करार शेती प्रमुख गौतम देसर्डा, श्रीराम पाटील, विभागीय व्यवस्थापक डी.एम. बऱ्हाटे, एस.एन. पाटील,  गजानन ठिबक जळकेचे संचालक पी.के. पाटील त्याच प्रमाणे सुधाकर येवले व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमास पंक्रोशीतील सुमारे ४०० शेतकरी उपस्थित होते.

oplus_2048

जैन इरिगेशनचे वितरक असलेले पी.के. पाटील हे वडिलोपार्जित शेती देखील करतात. उच्च तंत्रज्ञानाचा अवलंब करून ते आपली शेती करतात. गत चार वर्षांपासून ते टोमॅटोची लागवड करून भरघोस उत्पादन घेत आहेत. इतर शेतकऱ्यांना देखील प्रेरणा मिळावी या उद्देशाने त्यांनी पीक परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सर्वप्रथम शेतकऱ्यांची शिवार फेरी झाली. टोमॅटोच्या प्लॉटमध्ये जाऊन लागवडीची पद्धत, मल्चिंगचा तसेच आत इनलाईन ठिबक सिंचनाचा केलेला वापर इत्यादीचे अवलोकन शेतकऱ्यांनी केले. श्रीराम पाटील व करार शेतीचे प्रमुख गौतम देसर्डा यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.  पुढच्या वर्षी टोमॅटोची लागवड करायची असेल तर आदल्या वर्षापासूनच तयारी करणे श्रेयस्कर होते. 

जैन इरिगेशनची टोमॅटो, पांढरा कांदा आणि हळद याची करार शेती प्रकल्पाची संधी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहे. हळदीची देखील शेतकऱ्यांनी लागवड करावी. दहा महिन्यांमध्ये क्विंटल नव्हे तर टनामध्ये हळदीचे उत्पादन घेता येते त्या मोबदल्यात शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा मिळतो असे सांगून हळद लागवड करावी असे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमाचे आयोजक गजानन ठिबकचे संचालक पी के पाटील यांनी टोमॅटो लागवडीचे आपले अनुभव सांगितले. त्यात ते म्हणाले की, गेल्यावर्षी त्यांना ५८ मेट्रीक टन टोमॅटोचे उत्पादन मिळाले होते. या वर्षाची पीक परिस्थिती पाहिली असता ६० टनांहून अधिक टॉमॅटोचे उत्पादन अपेक्षीत असल्याचे ते म्हणाले. टोमॅटोचे पीक फायद्याचे कसे ठरते याबाबत सविस्तर सांगण्यात आले.

कामोमी कंपनीचे करार शेती विभागाचे सहकारी मनोहर देसले यांनी या परिसंवादात टोमॅटोची लागवड, पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन याबाबत माहितीत सांगितली. शाश्वत शेती करायची असेल तर आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांनी अवलंब करणे क्रमप्राप्त आहे. पारंपरिक पद्धतीने केलेली शेती परवडणारी ठरत नाही. पिकाची निवड, पीक पद्धती, फर्टिगेशन, ऑटोमेशन यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा याविषयी महाराष्ट्र विपणण प्रमुख एस.एन. पाटील यांनी मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी शरद पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी शासनाच्या विविध योजनांबाबत माहिती दिली. या योजनेत सहभागी होऊन शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळू शकेल. याविषयी परिसंवादात सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही. आर. सोळुंके व आभारप्रदर्शन श्रीराम पाटील यांनी केले. शेतकऱ्यांनी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून आपल्या शंकांचे समाधान करून घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here