वेटिंग लिस्ट तिकीट असले तरी मिळेल रेल्वेत जागा

    नवी दिल्ली – भारतीय रेल्वेने वेटींग लिस्ट धारक प्रवाशांना एक दिलासादायक वृत्त दिले आहे. आता ज्या प्रवाशांकडे वेटींग लिस्ट तिकिटे असली तरीही ट्रेनमध्ये बसण्यास जागा मिळणार आहे.

    मोठ्या वेटिंग लिस्टमुळे प्रवाशांचा ताण दूर करण्यासाठी भारतीय रेल्वेने क्लोन ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या क्लोन ट्रेनमधून केवळ तेच प्रवासी प्रवास करतील ज्यांच्याजवळ गंतव्यस्थानावर जाण्यासाठी वेटिंग तिकिटे मिळाली आहेत. क्लोन ट्रेनमुळे वेटिंग तिकीट कन्फर्म होण्याची प्रवासी वर्गाची चिंता नाहिसी होणार आहे.
    क्लोन ट्रेन इतर विशेष गाड्यांप्रमाणेच राहणार आहे. रेल्वेने या गाड्यांचे नाव क्लोन ट्रेन असे ठेवले आहे. याचे कारण म्हणजे या ट्रेनचा नंबर सारखाच असेल. क्लोन ट्रेन ही वेगवान राहील आणि मर्यादित स्थानकांवर थांबेल. या क्लोन ट्रेनमध्ये तृतीय क्लास एसी कोचला प्राधान्य देण्यात येईल.

    ज्या मार्गावर रेल्वेची वेटिंग लिस्ट बरीच मोठी आहे अशा मार्गावर क्लोन ट्रेन चालवण्याचे नियोजन आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या विशेष गाड्यांमध्ये वेटिंग लिस्ट जास्त असेल अशा परिस्थितीत आणखी एका ट्रेनची व्यवस्था करण्यात येईल. मुख्य ट्रेन सुटल्यानंतर अंदाजे एक तासाने ही क्लोन ट्रेन मार्गस्थ होईल. ज्या प्रवाशांकडे वेटिंग लिस्ट तिकिट असेल त्यांना ही सुविधा उपलब्ध होईल.

    ज्या प्रवाशांची तिकिटे वेटिंग लिस्टच्या मोठ्या यादीत आहे, ते प्रवासी रेल्वेच्या क्लोन ट्रेनद्वारे प्रवास करु शकतील. उदाहरणार्थ, बिहार येथून दिल्लीकडे जाणारी संपूर्ण क्रांती एक्स्प्रेसची वेटिंग लिस्ट भलीमोठी असल्यास, ही मुख्य रेल्वे सुटल्यानंतर त्याच नंबरची आणखी एक रेल्वेगाडी काही वेळाने दिल्लीकडे धावेल. ज्यामध्ये बिहार संपूर्ण क्रांतीच्या वेटिंग लिस्टमधील तिकिट धारक प्रवाशांना प्रवास करता येईल.

    १२ सप्टेंबरपासून भारतीय रेल्वे ४० जोडी गाड्या अर्थात ८० नवीन विशेष गाड्या धावणार आहेत. १२ सप्टेंबरपासून सुरु होणा-या ८० नवीन गाड्यांसाठी १० सप्टेंबरपासून आरक्षण सुरु होणार आहे. पुर्वी सुरु असलेल्या २३० गाड्यांव्यतिरिक्त या गाड्या राहतील.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here