बुरखा परिधान करून दागिने चोरी करणाऱ्या महिलांना अटक

जळगाव : बुरखा परिधान करून ज्वेलरी शॉप मालक व नोकराचे लक्ष विचलित करून दागिने चोरी करणाऱ्या बुरखाधारी अनोळखी महिलांना शनिपेठ पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. या चोरी प्रकरणी शनिपेठ पोलीस स्टेशनला 29 जानेवारी 2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

जळगाव शहरातील बालाजी पेठ, सराफ बजार येथील विश्वनाथ हनुमानदासजी अग्रवाल यांच्या मालकीच्या गोयल ज्वेलर्स या दुकानात दोन अनोळखी बुरखाधारी महिला सोन्याचे दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने आल्या होत्या.  त्यातील एका महिलेने दुकानात असलेल्या दोघांचे लक्ष विचलित केले. दरम्यान दुसऱ्या महिलेने दुकानाच्या काउंटर मधील 20 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून घेतले होते. 

या घटनेचे सुरुवातीपासून अखेरपर्यंत चोरट्या महिलांचा माग  घेणारे सीसीटीव्ही फुटेज शनिपेठ पोलीस पथकाने बारकाईने तपासले. चोरी करणाऱ्या महिला दुकानातून चोरी करून जळगाव शहरातील सुभाष चौक, घाणेकर चौक मार्गे पायी पायी चालत येवून काट्या फाईलच्या दिशेने येतांना आढळून आल्या. त्यानंतर पुढे खाजगी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी करण्यात आली. चोरट्या महिला एका खाजगी वाहनात बसून धुळे शहराच्या दिशेने गेल्याचे आढळून आले. पारोळा टोल नाक्यावर या वाहनाचा फास्टटॅगचा तपशील संकलित करून मोबाईल क्रमांकाच्या आधारे चालकास चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले. 

या चोरट्या महिला भाड्याचे वाहन करून मालेगाव येथून जळगावला आल्या होत्या. त्यांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात आली त्यांच्या ताब्यातील चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. अटकेतील महिलांविरुद्ध फैजपुर पोलीस स्टेशन, आझाद नगर पोलीस स्टेशन मालेगाव, कोल्हापुरी गेट पोलीस स्टेशन अमरावती, साक्री पोलीस स्टेशन, पिंपळनेर पोलीस स्टेशन, चिखली, शेगाव अशा विविध पोलीस स्टेशनला चोरीचे गुन्हे दाखल आहेत. पो.नि. रंगनाथ धारबळे यांच्या पथकातील साजिद मंसूरी, पोलीस उप निरीक्षक योगेश ढिकले, हेड कॉन्स्टेबल विजय खैरे, पोना किरण वानखेडे, पोकॉ निलेश घुगे, मपोकॉ काजल सोनवणे, तसेच नेत्रम विभागातील पोकॉ मुबारक देशमुख आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here