जळगाव : धावत्या रेल्वेत चोऱ्या करणाऱ्या नायडू गँगच्या चौघांना अमळनेरच्या रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. अटकेतील चौघांना मध्य प्रदेश पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अविनाश महानन्ना नायडू, अजय महानन्ना नायडू आणि काली कुन्नईया नायडू (तिघे रा. वाकीपाडा मरीमाता मंदिराजवळ, नवापूर) आणि राजा आरमबम (रा. अमरनगर, उज्जैन, मध्यप्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत.
खंडवा रेल्वेस्थानकावर प्रवाशांकडील सामान चोरी झाल्याची तक्रार आली होती. या घटनेतील गॅंगचे काही सदस्य 4 फेब्रुवारी रोजी भुसावळ – उधना गाडीने प्रवास करत होते अशी माहिती रेल्वे पोलिसांना समजली. प्राप्त तक्रारी व माहितीनुसार रेल्वे पोलिसांनी तपास सुरु केला होता. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सुरू असलेल्या तपासाचा आधार घेत या घटनेची माहिती खंडवा पोलिसांकडून अमळनेरच्या रेल्वे पोलिसांना देण्यात आली.
रेल्वेगाडी अमळनेर स्टेशनवर येताच रेल्वे पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला. तीन-चार डबे तपासल्यावर सामान्य कोचमध्ये चार संशयित आढळून आले. त्यांना पोलिसांनी तिकीट आहे का, असा प्रश्न करून अमळनेर स्टेशनवर चौकशीला उतरवले. सखोल चौकशीअंती संशयतांनी आपण नायडू गँगचे सदस्य असल्याची कबुली दिली. त्यांच्या कब्जातील दोन लॅपटॉप, सहा मोबाईल, चार्जर, घड्याळ, 46 हजार रुपये रोख असा एकूण 2 लाख 81 हजार रुपयांचे साहित्य तसेच दोन धारदार चाकू जप्त करण्यात आले आहेत.