मुंबई दि.४ प्रतिनिधी – जैन इरिगेशनचे चित्रकार श्री. विकास मल्हारा यांच्या अमूर्त चित्राला, महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाच्या ६४ व्या वार्षिक प्रदर्शनात प्रमाणपत्र व रोख रुपये ५२, ५०० (रुपये बावन्न हजार पाचशे) रेखा व रंगकला विभागात पारितोषिक प्राप्त झाले आहे.
![](https://crimeduniya.com/wp-content/uploads/2025/02/003-22-VikasM-FB_IMG_1624027722607-copy.jpg)
महाराष्ट्राचे राज्यपाल मा. श्री. सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते विकास मल्हारा यांना गौरविण्यात आले. याप्रसंगी प्रमुख उपस्थिती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे, मा. अॅड राहुल सुधा सुरेश नार्वेकर (विधानसभा अध्यक्ष), मा. श्री. चंद्रकांत (दादा) सरस्वती बच्चू पाटील (मंत्री-उच्च व तंंत्र शिक्षण), मा. अॅड आशिष मिनल बाबाजी शेलार (मंत्री-सांस्कृतिक कार्य), मा. श्री. इंद्रनिल अनिता मनोहर नाईक (मंत्री- राज्यमंत्री उच्च व तंंत्र शिक्षण), मा. श्री. अरविंद आशालता गणपत सावंत (लोकसभा सदस्य), श्री. बी वेणुगोपाल रेड्डी (भा.प्र.से, अप्पर मुख्य सचिव-उच्च व तंत्र शिक्षण), डॉ. संतोष संज्ञा भास्कर श्रीरसागर (संचालक-कला संचालनालय) महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीत जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई येथे दि ४ फेब्रुवारी २०२५ रोजी सायं ५.३० वा. संपन्न झाला. सदर प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरीत ४ ते १० दरम्यान सर्वांसाठी खुले असणार आहे. जैन इरिगेशनचे अध्यक्ष श्री. अशोकभाऊ जैन यांनी विकासचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या असून विकास मल्हारा यांना ‘बॉम्बे आर्ट सोसायटीचे गोल्ड’, ‘आर्ट सोसायटी आॅफ इंडिया’, ‘टगोर अॅवार्ड’ व इंडिया आर्ट अॅण्ड क्राफ्ट सोसायटी िदल्ली असेही अॅवार्डस प्राप्त झाले आहेत.
______________________
तुम्हाला दूरवर डोंगरावर कुणाची तरी वाट पाहणारं छोटंसं गाव या चित्रात दिसेल किंवा गवताचं प्रचंड कुरणही. बर्फातून चाललेली वाट न्याहाळता येईल तर कळत-नकळत विस्थापित होत जाणारा निसर्ग दिसेल!
मनातल्या मनात स्वतःशी तुम्ही बोलू लागता तोवर ही चित्रंही तुमच्याशी संवाद साधू लागतात. चित्रातील रेषा आशयाला संपन्न करते.रेषा वर्तमानाचा धागा चिवटपणे जोडतात, स्मृतीचा बंध-अनुबंध घट्ट धरून ठेवतात.
चित्राशी आत्मीयतेचे नाते विणले जाते, चित्र जणू ‘चित्तरकथा’ सांगू पाहतं. बीज अंकुरावे आणि बालतरु व्हावे इतकी सहज असते ही प्रक्रिया!
स्वच्छंदी फुलपाखरासारखी मुक्त शैली मला जाणवते. ‘स्वमग्नता’ हासुद्धा या चित्राचा स्थायीभाव. शैली मात्र बदलत राहणारी. या चित्रात तोचतोचपणा नसतो, वेगळा आशय, निराळी अभिव्यक्ती प्रतिबिंबित होते. प्रयोगशीलता हा त्यांच्या व्यक्ततेचा ठाशीव गुण, चांगलं स्वीकारण्याची राजहंसी वृत्ती विकासजींच्या गुणग्राही स्वभावात आहे.
रंगांचे जाणवणारे अनेकविध कवडसे, हे सुंदर भावविश्व तुमच्याशी संवाद साधू पाहतं. या चित्रातील रंगांना स्पर्श करून पहा, क्षणार्धात जिवंतपणा जाणवेल. रंगातील ‘तलमता’ही सुकोमलतेने जपली आहे, या रंगजाणिवा हृदयाचा ठाव घेतात. चित्रांची ही श्रीमंती मला विकासजींच्या स्टुडिओत जाणवली.
शांत स्वभाव, निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याची मनापासून आवड आहे.
विकासजी एक मनस्वी कलावंत आहेत. त्यांच्या चित्रातील सहजता, नाविण्यपूर्णता आणि नितांत सुंदर प्रयोगशीलता मला महत्त्वाची वाटते.
विकासजींचे हार्दिक अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!
— शरद तरडे, प्रख्यात अमूर्त चित्रकार, पुणे
____________________________
झरोख्यातून डोकावणारा अवकाश आणि प्रकाश या दोन मध्ये जेव्हा संवाद साधला जातो तेव्हा चित्राची निर्मिती होते असे चित्रावरून दिसतं चित्रातलं जडत्व हे आकार रूप घेत असतं आणि त्या आकारांमध्ये खेळताना निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह चा वेगळ्या दृष्टिकोनाने पाहण्याचा आणि अनुभवण्याचा एक योग विकासाच्या चित्रातून येतो या जडत्वालाही रंगवताना विकास स्वाभिमानाने कुठेतरी आपल्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतो. आयुष्यात नकळत पाहण्यात आलेल्या गोष्टी जेव्हा आकाररूपी चित्रातून येतात तेव्हा ते चित्र प्रगल्भ होतं आणि प्रगल्भ झालेल्या चित्राला चौकटीत बसवताना मर्यादे पलीकडे पाहण्याची दृष्टी लागते. चित्र घडत जातं घडत असताना फक्त आणि फक्त अवकाश आपल्यासमोर प्रतिबिंब निर्माण करतात. सहस्ता आणि सजगता हा चित्राचा मूळ भाव आहे. आणि हाच या चित्राचा मूळ गाभा आहे.
— प्रकाश वाघमारे, प्रख्यात अमूर्त चित्रकार, मुंबई
______________
काला एक मुकम्मल साज़ है
उसे बजाने का अर्थ है
बीज हो जाना,
जहां सातों स्वर शुद्ध लगते हैं
साज में महाप्राण लगाओ तो
सप्तक चांद हो जाता है
और कलाकार रात्रि।
— मोहन शिंगने, प्रख्यात अमूर्त चित्रकार, अंबाला
__________________
कृष्णधवल रंगातील या चित्रात एक सहजता आहे आणि साधेपणाही. मुक्ततेसह शांतताही! ‘छाया- प्रकाशाची नाट्यमयता’ हा या चित्रातील मुख्य गाभा आहे. चित्रातील प्रकाशाला मृदूतेसह तरलताही आहे आणि कोवळेपणादेखील !
विकास यांच्या स्वभावाचे प्रतिबिंबच जणू अवतरलं!
— हेमंत धाने, प्रख्यात अमूर्त चित्रकार, मुंबई