रेल्वे प्रवासातील दाम्पत्याचे दागिने चोरणारे तिघे परप्रांतीय ताब्यात

जळगाव : रेल्वेच्या एसी कोच मधून लेडीज पर्स चोरी करणाऱ्या परराज्यातील तिघा आरोपींना रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्या ताब्यातून 18 लाख 6 हजार 189 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे. याप्रकरणी लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिलीप कुमार प्रतापचंद जैन हे आंध्र प्रदेशातील रहिवासी 12655 डाऊन नवजीवन एक्सप्रेस या गाडीने अहमदाबाद ते वेल्लोर असा सपत्नीक प्रवास करत होते. ते झोपेत असल्याचा फायदा घेत तिघा चोरट्यांनी त्यांच्या ताब्यातील सोन्याचे दागिने असलेली पर्स चोरून नेली होती. 

पोलीस अधिक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुर्यकांत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुधीर भायरकर, सपोनि किसन राख, रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी पांचुराम मिना, दयानंद यादव, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोहवा जयकुमार रमेश कोळी, रविंद्र पाटील, दिवानसिंग राजपुत, धनराज लुले, विलास जाधव, पो.कॉ. बाबु मिर्जा तसेच रेल्वे सुरक्षा बल भुसावळचे प्रधान आरक्षक महेंद्र कुशवाह, दिपका शिरसाठ, ईमरान खान यांनी या कामगिरीत सहभाग घेत तपास पूर्ण केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here