जळगाव : मालवाहू वाहन चोरी करणा-या दोघा चोरटयांना एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने जेरबंद केले आहे. त्यांच्या ताब्यातील चोरीचे छोटा हत्ती हे वाहन जप्त करण्यात आले आहे. असरार शेख मुक्तार शेख आणि मुश्ताक हसन सैय्यद अशी अटक करण्यात आलेल्या दोघा चोरट्यांची नावे आहेत.
कुसुंबा येथील रहिवासी स्वप्नील गोविंदा राठोड यांनी त्यांच्या मालकीचे मालवाहू वाहन 21 जानेवारी रोजी सायंकाळी त्यांच्या घरासमोर लावले होते. दुस-या दिवशी सकाळी ते वाहन चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली असता गुन्ह्यातील वाहन चोरी करतांना चोरट्यांनी ओळख लपवण्यासाठी चेह-यावर मास्क लावून बनावट चावीने वाहनांचे लॉक उघडून वाहन चोरी केल्याचे दिसून आले. हा प्रकार ओळखीच्या व्यक्तीने केल्याचा संशय पोलिसांना आला. दरम्यान पो. कॉ. सिद्धेश्वर डापकर यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे चोरीचा हा प्रकार मास्टर कॉलनी भागातील रहिवासी असरार शेख मुक्तार शेख आणि मुश्ताक हसन सैय्यद या दोघांनी केल्याचे समजले. यातील मुश्ताक सैय्यद हा फिर्यादी वाहन मालक स्वप्नील राठोड यांच्याकडून त्यांचे वाहन नेहमी भाड्याने घेत असे. त्यानेच बनावट चावीने त्याचा मित्र असरार शेख यांच्या मदतीने वाहन चोरुन नेले होते.
पोलिस पथकाने दोघा चोरट्यांना पलायन करण्याची संधी न देता त्यांना त्यांच्या घरातून शिताफीने ताब्यात घेतले. दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 14 फेब्रुवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यांच्या ताब्यातून चोरीचे मालवाहू वाहन हस्तगत करण्यात आले आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, पो ना किशोर पाटील, पो कॉ योगेश घुगे करत आहेत.