जळगाव : चाळीसगांव शहरातील घरफोडीच्या गुन्ह्यातील दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून न्यायालयाने दोघांना चार दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. सांजनसिंग रुपसिंग टाक आणि प्रेमसिंग रामसिंग टाक अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
चाळीसगांव शहराच्या शिवाजी चौकातील भवानी ट्रेडिंग परिसरात 1 ते 4 फेब्रुवारी या कालावधीत घरफोडी झाली होती. या घरफोडी बाबत चाळीसगांव शहर पोलिस स्टेशनला रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा करत होती. तांत्रिक तपासाच्या आधारे हा गुन्हा साजनसिंग रुपसिंग टाक आणि त्याचा साथीदार प्रेमसिंग रामसिंग टाक या दोघांनी केल्याचे निष्पन्न झाले. दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी आपला गुन्हा कबूल केला. दोघांकडून गुन्ह्यातील 1 लाख 93 हजार रुपये रोख आणि 5 लाख 10 हजार रुपये रकमेचे 59.53 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने, 1 लाख 15 हजार रुपये किमतीचे 1374.65 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागीने असा एकुण 8 लाख 18 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची 15 फेब्रुवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकातील पोउपनिरी शेखर डोमाळे, ही. कॉ. सुधाकर अंभोरे, मुरलीधर धनगर, राहुल पाटील, महेश पाटील, सागर पाटील, भुषण शेलार, प्रियंका कोळी, दिपक चौधरी आदींनी या तपास कामगिरीत सहभाग घेतला.