बुलढाणा : देशाच्या सिमेवरील जवानाला सिमेपलीकडील शत्रु सहज ओळखता येतात आणि त्या शत्रुविरुद्ध दोन हात देखील करता येतात. मात्र समाजातील शत्रु ओळखणे त्याला कधी कधी कठीण जाते. सिमेवरील शत्रुपेक्षा समाजातील स्वकीय शत्रुसोबत लढणे कधी कधी सिमाप्रहरी जवानाला कठीण जाते. नाना पाटेकर अभिनीत “प्रहार” या चित्रपटात अशाच स्वरुपाचे कथानक दर्शवण्यात आले आहे.
बुलढाणा जिल्ह्यच्या सावखेड तेजन येथील रहिवासी जवानाच्या बाबतीत देखील असाच काहीसा प्रकार घडला असून तो स्वकियांविरुद्ध लढा देत आहे. स्वकियांविरुद्ध लढण्यापेक्षा परकीयांविरुद्ध लढणे बरे असे या जवानाला म्हणण्याची वेळ आली आहे. गजानन कडुबा कायंदे असे भारतीय सेना दलातील जवानाचे नाव असून त्याला स्वकीयांविरुद्ध लढण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. गजानन कडुबा कायंदे आणि संतोष कडुबा कायंदे हे दोघे सावखेड तेजन येथील रहिवासी असलेले सख्खे भाऊ आहेत. दोन वर्षापुर्वी आपल्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी गजानन कायंदे हे पोलिस प्रशासनाकडून न्यायाची अपेक्षा व्यक्त करत आहेत.
सामाजीक कार्याची आवड असलेले सिमेवरील जवान गजानन कायंदे आणि त्यांचा सख्खा भाऊ संतोष कडुबा कायंदे या दोघा भावांमधे शेतीच्या रस्त्यावरुन जुना वाद आहे. दोघांनी एकमेकांविरुद्ध विविध कार्यालयांमधे तक्रारी दिल्या. 4 मार्च 2022 रोजी दोघा भावांमधे व दोघांच्या परिवारात वाद झाला होता. या वादातून एका महिलेने 6 मार्च 2022 रोजी जवान गजानन कायंदे यांच्याविरुद्ध स्थानिक सिंदखेडराजा पोलिस स्टेशनला विनयभंगाची तक्रार त्यावेळी दाखल केली. आपल्याविरुद्ध विनयभंगाची तक्रार दाखल झाल्याने गजानन कायंदे व्यथीत झाले. शेतीचा वाद हे सर्व तक्रारीचे उगमस्थान असल्याचे म्हटले जाते. त्यानंतर 11 मार्च 2022 रोजी जवान गजानन कायंदे यांनी दिलेल्या जवाबानुसार त्यांच्या भावाच्या परिवाराविरुद्ध भा.द.वि. कलम 324, 323, 504, 506 व 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
दोन्ही गुन्ह्यातील जखमींचे वैदयकीय प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर त्या आधारे दोन्ही गुन्हयामध्ये भा.द.वि. कलम 326 समाविष्ट करण्यात आले. आपल्याविरुद्ध सिंदखेड राजा पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्यात आपणास पोलिस प्रशासन कोणत्याही प्रकारचे सहकार्य करत नसल्याची गजानन कायंदे यांची तक्रार आहे. त्यामुळे त्यांनी राज्य मानवी हक्क आयोग मुंबई येथे पोलिस प्रशासनाविरुद्ध तक्रार दाखल करत न्यायाची मागणी केली. याउलट सिंदखेड राजा पोलिस स्टेशनचे तत्कालीन पोलिस निरीक्षकांनी दोन्ही बाजुच्या लोकांनी दिलेल्या तक्रारी व वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारेच कायदेशीर गुन्हे दाखल केले असल्याचे राज्य मानवी हक्क आयोगाला दिलेल्या पत्रात म्हटले आहे. यात पोलिसांनी कोणतेही कथीत अथवा कट कारस्थान रचून खोटे गुन्हे दाखल केले नसल्याचे तत्कालीन बुलढाणा पोलिस अधिक्षक अरविंद चावरीया यांनी म्हटले आहे. तथापी आपल्याला योग्य तो न्याय मिळावा, आपल्यावर हल्ला करणा-या व मोकाट फिरणा-यांना शासन व्हावे यासाठी सिमा प्रहरी गजानन कायंदे प्रयत्नशील आहेत.