जळगाव : ट्रॉली चोरणा-या त्रिकुटास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. विनोद ऊर्फ स्वामी रवींद्र कोळी, विनोद ऊर्फ दशरथ गोपाल कोळी, वैभव उर्फ चाळीस हेमंत कोळी अशी यावल तालुक्यातील तिघा चोरट्यांची नावे आहेत. ट्रॉली चोरण्यासाठी वापरलेले ट्रॅक्टर आणि मोटार सायकल तसेच चोरीची ट्रॉली असा मुद्देमाल त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आला आहे.
दिनांक 11 जानेवारी रोजी बोदवड तालुक्यातील नांदगाव येथील अमोल राजाराम पाचपोळ यांच्या शेतातून ट्रॉली चोरी झाली होती. या घटने प्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध दाखल गुन्ह्याचा तपास सुरू होता. तपासादरम्यान हा गुन्हा विनोद ऊर्फ स्वामी रवींद्र कोळी (रा. भोरटेक ता.यावल), विनोद ऊर्फ दशरथ गोपाल कोळी, वैभव उर्फ चाळीस हेमंत कोळी (दोन्ही रा. पाडळसे ता.यावल) यांनी केला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाबन आव्हाड यांना समजली.
त्या माहितीच्या आधारे त्यांना चौकशीकामी ताब्यात घेतले असता त्यांनी आपला गुन्हा कबुल केला. ट्रॉली चोरण्याचा गुन्हा करण्यासाठी तिघांनी वापरलेले स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर आणि मोटार सायकल असा 4 लाख 93 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आला आहे. चोरलेली ट्रॉली तिघांनी अमळनेर येथे विक्री केल्याची माहीती अटकेतील तिघांनी पोलिस पथकाला दिली. पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकातील पोलीस उप निरीक्षक दत्तात्रय पोटे, सहायक फौजदार अतूल वंजारी, विष्णू बिऱ्हाडे, हरीलाल पाटील, विजय पाटील, ईश्वर पाटील, प्रदीप चवरे, चालक प्रमोद ठाकूर आदींनी या तपासकामी सहभाग घेतला. ट्राली चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले असून अटकेतील तिघांना बोदवड पोलीस स्टेशनच्या ताब्यात पुढील कारवाईकामी देण्यात आले आहे.