आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर गावकऱ्यांचा हल्ला

जळगाव : गावठी कट्ट्यासाठी कुप्रसिद्ध असलेल्या मध्य प्रदेशच्या सीमेवरील उमर्टी या गावी आरोपीला पकडण्यासाठी गेलेले चोपडा पोलिसांचे पथक आणि त्याच्या बचावासाठी सरसावलेले गावकरी असे सरळ सरळ दोन गट पडून त्यांच्यात चकमक उडाली. या घटनेत फायरिंगसह एका पोलिसाला जवळपास तीन तास डांबून ठेवण्याचा प्रकार घडला. या घटनेत दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. सुमारे वीस वर्षांपूर्वी चोपडा शहर पोलिस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक बुधवंत अशाच स्वरूपाच्या चकमकीत मध्य प्रदेशातील धावडा येथे जखमी झाले होते. शनिवारी रात्री सात वाजेच्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली. 

एका जुन्या गुन्ह्यात हवा असलेला कुविख्यात गुन्हेगार पप्पीसिंग शिकलगर यास अटक करण्यासाठी चोपडा पोलिसांचे एक पथक उमर्टी या गावी गेले होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक शेषराव नितनवरे यांच्यासह शशिकांत पारधी, दीपक शिंदे, चेतन महाजन, विशाल पाटील, किरण पारधी आदींचे पथक कारवाई पथकात सहभागी झाले होते. दोन्ही राज्यांची सीमा असलेल्या अनेर नदीच्या पुलावर असलेल्या पार उमर्टी गावाचे गावकरी आणि पोलिसांमध्ये आरोपीचा ताबा देण्याघेण्यावरून वाद सुरू झाला. 

मोजक्या पोलीस पथकासमोर सुमारे दीडशे गावकऱ्यांचा जमाव चाल करून आला. या गावकऱ्यांनी पोलीस पथकाला घेराव घातला. पोलीस कर्मचारी शशिकांत पारधी आणि किरण पारधी यांना मारहाण झाली. शशिकांत पारधी यांना रात्री नऊ वाजेपर्यंत जमावाने पकडून ठेवले. बचावासाठी गावकऱ्यांनी दोन तर पोलिसांनी तीन राउंड फायर केले. 

घटनेची माहिती समजताच मध्य प्रदेशातील सेंधवा येथील पोलीस अधिकारी अजय वाघमारे यांच्यासह सेंधवा, वरला आणि नागलवाडी येथून पोलिसांच्या तुकड्या घटनास्थळी पोहोचल्या. रात्री सुमारे अकरा वाजेपर्यंत उमर्टी गावी कारवाई सुरू होती. जखमी सहाय्यक पोलीस निरीक्षक शेषराव नितनावरे आणि कर्मचारी किरण पारधी या दोघांना वैद्यकीय उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले।

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here