जळगाव : गावठी पिस्टल बाळगत दहशत माजवणा-यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाचोरा शहरातून जेरबंद केले आहे. अश्वीन उर्फ विशाल शंकर पाटील (रा.देशमुखवाडी – पाचोरा) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. पाचोरा शहरातील भारत डेअरी परिसरातून त्यास सापळा रचून ताब्यात घेण्यात आले.
अश्विन उर्फ विशाल पाटील हा गावठी कट्टयासह पाचोरा शहरातील भारत डेअरी परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला समजली होती. त्या माहितीच्या आधारे पोलीस उप निरीक्षक शेखर डोमाळे, लक्ष्मण पाटील, रणजीत जाधव, ईश्वर पाटील, जितेंद्र पाटील, राहुल महाजन, प्रमोद ठाकुर या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला शिताफीने जेरबंद केले. त्याच्या कब्जातून वीस हजार रुपये किमतीचा विनापरवाना गावठी कट्टा हस्तगत करण्यात आला. त्याच्याविरुद्ध पाचोरा पोलीस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे.