घाटंजी (यवतमाळ) : नागपूर – हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील निलजई गावाजवळील रामदेवबाबा ढाब्याच्या मालकाला बंदूक व चाकूचा धाक दाखवून त्याच्या गल्ल्यातील १५ हजार २०० रुपये काढून घेऊन तीन आरोपी पसार झाल्याची घटना काल पहाटे अडीच वाजताच्या दरम्यान घडली. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींना अवघ्या दोन तासात जेरबंद केले. करण संजय शिंदे (३०, रा. ताडउमरी), सुमित मोक्षवीर वानखेडे (२५, रा. लटारे ले-आऊट, पांढरकवडा) व शेख समीर शेख चांद (२३, रा. आखाडा वॉर्ड, पांढरकवडा) अशी आरोपींची नावे आहेत.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील निलजई शिवारातील रामदेवबाबा ढाबा नेहमीप्रमाणे रात्री १२ वाजता बंद झाला होता. गुरुवारी पहाटे अडीच वाजताच्या सुमारास तीन व्यक्ती दुचाकीने ढाब्यातर आले. ढाब्यावर उपस्थित अंकित नरपतराव कुलेरिया यांच्याकडे जेवणाची व्यवस्था करण्याची मागणी केली. अंकीतने ढाबा बंद झाला आहे, त्यामुळे जेवण मिळणार नसल्याचे नम्रपणे सांगताच, त्यातील एकाने अंकितवर बंदूक ताणली तर दुसऱ्याने चाकू दाखवला. अचानकपणे झालेल्या या प्रकारामुळे अंकित घाबरून गेला. याचवेळी तिसऱ्या आरोपीने अंकीतच्या ढाब्यावरील गल्ल्यात ठेवलेले १५ हजार २०० रुपये काढून घेतले. आरोपींनी अंकितला आरडाओरडा केल्यास जीवे मारण्याची धमकी देत पैसे घेऊन तिघेही दुचाकीने करंजी-वडकी गावाच्या दिशेने पसार झाले.
अवघ्या दोन तासात पोलिसांनी या तीनही आरोपींना शोधून काढत बेड्या ठोकल्या. त्यांच्याजवळून बंदूक, चाकू व रोख रक्कम जप्त करण्यात आली. याप्रकरणी पांढरकवडा पोलिसांनी लुटारुंविरुद्ध भारतीय न्याय सहींता कलम ३०९ (६) व आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पांढरकवडाचे ठाणेदार दिनेश झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नितीन सुशीर, प्रमोद जुनूनकर, सचिन काकडे, राजू बेलेवार, गौरव नागलकर, राजू मुत्यालवार यांनी यशस्वीरीत्या केली.
राष्ट्रीय महामार्गावरील लुटमारीच्या घटनेने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनेकदा व्यापारी, फायनान्स कंपनीचे कर्मचारी रोकड घेवून प्रवास करतात. यापूर्वी त्यांनाही लुटण्यात आल्याच्या घटना यवतमाळ, उमरखेड, पुसद तालुक्यात घडल्या आहेत. अंकितने तत्काळ ११२ नंबरवर कॉल करून घटनेची माहिती पोलिसांना दिली. तातडीने पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी ढाब्यावरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले व पोलिस आरोपींच्या मागावर निघाले.