घरफोडी करणारा आरोपी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह जेरबंद

जळगाव : जळगांव शहरातील रामानंद नगर पोलिस स्टेशन हद्दीत घरफोडी करणा-या सराईत आरोपीस 12 लाख 50 हजार रुपये किंमतीचे 159.92 ग्रॅम सोने व 450 ग्रॅम चांदीच्या दागिन्यांसह जेरबंद करण्यात आले आहे. साहील प्रविण झाल्टे उर्फ साहील शेख खलील शेख (रा. पश्चिम हुडको, चाळीसगांव रोड, पवन नगर धुळे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 

रामानंद नगर पोलीस स्टेशन हद्दीतील रहिवासी पराग जगन्नाथ चौधरी यांच्या बंद घरात चे कुलूप तोडून त्यांच्या घरातील 22 तोळे सोने व 450 ग्रॅम चांदीचे दागिने व रोख रक्कम 16 हजार 500 असा ऐवज गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात चोरी झाला होता. या घटने प्रकरणी रामानंदनगर पोलीस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बोरुडे या गुन्ह्याचा तपास करत होते. 

रामानंद नगर पो.स्टे. हद्दीतील वेगवेगळया ठिकाणाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात एक संशयीत इसम मोपेड गाडीवर संशयास्पदरित्या फिरतांना दिसुन आला. त्याचा फोटो जळगांव शहरातील माहितगार इसमांना दाखवला असता तो जळगांव शहरातील नसल्याचे समजले. त्यानंतर भुसावळ टोलनाका व पारोळा टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता पारोळा टोल नाक्यावर संशयीत इसम दिसुन आला. या संशयित आरोपीबाबत पारोळा, अमळनेर, धुळे या परिसरात माहितगार इसमांकडे विचारपुस केली असता त्याचे नाव साहिल प्रविण झाल्टे असून तो धुळे येथील घरफोडया करणारा सराईत गुन्हेगार असल्याचे पोलीस पथकाला समजले. त्याच्या राहत्या घरी वेळोवेळी जावुन शोध घेतला असता तो घरी मिळत नव्हता. गुन्हेगार साहिल यास जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद करुन रामानंदनगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे. 

अटकेतील आरोपीविरुद्ध वडनेर खाकुर्डी पो.स्टे. तालुका मालेगांव आणि चाळीसगांव रोड पो.स्टे., धुळे या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. पोउपनि. प्रदिप बोरुडे यांनी आरोपी साहिल यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली. पोलीस कोठडी दरम्यान त्याने आपला गुन्हा कबूल केला. तपासा दरम्यान त्याने गुन्हयात चोरलेले चांदीचे दागिने त्याच्या घरातुन काढुन दिले. तसेच त्याने चोरलेले सोने हे इतर साथीदारांच्या मदतीने वितळवले असल्याचे त्याने कबूल केले. त्याने दिलेल्या कबुलीनुसार त्याचे साथीदार पवनराज संजय चौधरी (रा.हत्ती गल्ली, पारोळा), सागर वाल्मीक चौधरी (रा. आझाद चौक, पारोळा), केशव बाळु सोनार (रा.शाहु नगर, अमळनेर) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून गुन्ह्यातील मुद्देमाल तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल आणि मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे.

प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जळगांव यांच्या आदेशाने चोरीचा हस्तगत मुद्देमाल फिर्यादीस परत करण्यात आला. रामानंद नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या पथकातील पोलीस उपनिरिक्षक प्रदिप बोरुडे, पो.हे.कॉ जितेंद्र राजपुत, पोहेकॉ इरफान मलिक, पोहेकॉ सुशिल चौधरी, पो.हे.कॉ प्रविण भोसले, पोना रेवानंद साळुखे, पोशि उमेश पवार, पोशि रविंद्र चौधरी, पोशि प्रविण सुरवाडे आदींनी या गुन्ह्याच्या तपास कामी सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here