घरफोडीचे दोन गुन्हे चोवीस तासात उघडकीस

जळगाव : एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत घडलेले घरफोडीचे दोन गुन्हे अवघ्या 24 तासात एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने उघडकीस आणले आहेत. एका गुन्ह्यातील सराईत आरोपी विशाल मुरलीधर दाभाडे यास ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी 1 लाख 15 हजार रुपयांची चांदी तसेच रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल हस्तगत करण्यात आली आहे. घरफोडीच्या दुसऱ्या गुन्ह्यात विधी संघर्षित बालकास ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून चोरीस गेलेले 23 हजार 300 रुपये हस्तगत करण्यात आले आहेत.

एसटी वर्कशॉप परिसरातील रहिवासी सुरेश हिरामण सोलंकी यांच्या बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील 1,60,000/- रुपयाची चांदी व रोख 40,000/- रुपये चोरी झाल्या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, पोना किशोर पाटील, योगेश बारी, पोकॉ नितीन ठाकुर, राहुल घेटे, नाना तायडे, किरण पाटील करत होते. 

तपासा दरम्यान परीसरातील जवळपास 51 सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. सीसीटीव्ही फुटेज मधील आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार विशाल मुरलीधर दाभाडे याने त्याच्या साथीदारासोबत केल्याचे निष्पन्न झाले. त्याचा शोध घेतला असता तो त्याच्या राहत्या घरी मिळून आला नाही. तो मध्यप्रदेशातील श्री ओंकारेश्वर मंदीर येथे देवदर्शनासाठी गेला असल्याची माहीती पोका राहुल घेटे यांना समजली. 

आरोपी विशाल हा गुन्हयातील चोरलेला माल विल्हेवाट लावण्याची दाट शक्यता असल्याने पोउपनि राहुल तायडे पथकासह ओंकारेश्वर मध्यप्रदेश येथे रवाना झाले. परंतु सराईत गुन्हेगार विशाल दाभाडे हा कोणताही पुरावा मागे ठेवत नसल्याने व तो नेमका कोठे थांबुन आहे याची काहीएक माहीती मिळत नव्हती. तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने त्याला ओंकारेश्वर मंदिर परिसरातील एका लॉजमधून ताब्यात घेण्यात आले. साथीदार दीपक राजू पाटील याच्या मदतीने आपण हा गुन्हा केल्याचे त्याने कबूल केले. तपासादरम्यान गुन्हयातील चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी 1,15,000/- रुपयाची चांदी तसेच रोख रक्कम व गुन्हयात वापरलेली मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे. आरोपी विशाल मुरलीधर दाभाडे याच्या विरुद्ध जळगाव शहरातील एमआयडीसी, जिल्हापेठ पोस्टे, रामानंद नगर पोस्टे येथे घरपोडीचे एकूण बारा गुन्हे दाखल आहेत. 

एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अजून एक गुन्हा उघडकीस आणला आहे. गणेशपुरी मेहरुण परिसरातील रहिवासी मोहसीन खान अजमल खान यांच्या राहत्या घरातुन 23,300/-रुपये चोरी झाले होते. या घटाने प्रकरणी दाखल गुन्ह्याचा तपास सुरु होता. एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोकॉ रतन गिते, नितीन ठाकुर, राहुल घेटे यांनी गुप्त माहीती काढत मास्टर कॉलनी परीसरातील विधीसंघर्ष बालकाने ही घरफोडी चोरी केल्याचे निष्पन्न केले. त्याला ताब्यात घेत त्याच्याकडून चोरीचे 23 हजार 300 रुपये हस्तगत करण्यात आले. या गुन्हयाचा तपास पोउपनि अशोक काळे, पोकॉ नरेंद्र मोरे हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here