जळगाव : मोटार सायकलने गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या आलेल्या इसमास मोटारसायकल सह त्याच्या कबजातील 9 किलो 522 ग्रॅम वजनाच्या गांजाच्या पोत्यासह ताब्यात घेण्यात आले. मुकेश विष्णू अभंगे असे अटक करण्यात आलेल्या जळगाव येथील कंजरावाडा परिसरातील रहिवासी इसमाचे नाव आहे. एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस नाईक प्रदीप चौधरी यांनी या गांजा प्रकरणी त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना कळवले होते. त्यानुसार या कारवाईला वेग आला.
मेहरुण बगीचा परीसरात सापळा रचून गांजा विक्री करण्याच्या उद्देशाने मोटार सायकल वर फिरत असणाऱ्या मुकेश अभंगे यास शिताफीने ताब्यात घेत अटक करण्यात आली. या कारवाई प्रसंगी शासकिय पंच, फोटोग्राफर, वजनकाटा धारक, फॉरेन्सीक व्हॅन आदींना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्यासह पोउपनि राहुल तायडे, चंद्रकांत धनके, सफौ दत्तात्रय बडगुजर, पोना योगेश बारी, पोका. नितीन ठाकुर, राहुल घेटे, योगेश घुगे आदींच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.
9 किलो 522 ग्रॅम गांजा आणी गुन्ह्यात वापरलेली होंडा युनीकॉर्न मोटार सायकल असा एकुण 1,07,132/- रुपये किमतीचा मुद्देमाल या कारवाईत जप्त करण्यात आला. पोना प्रदीप चौधरी यांच्या फिर्यादीवरुन एनडीपीएस कलम 8 (क) 20 (ब)ii (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्हयाचा तपास पोउनि सचीन नवले, पोका चेतन पाटील करत आहेत. अवैधरीत्या अंमली पदार्थाची विक्री करत असल्यास त्याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला तात्काळ खबर देण्याचे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. खबर देणा-याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल.