खून्नसने बघतो म्हणून रोहीतच्या मनात होता राग – चाकूच्या घावात हेमंतसह शमवली मनातली आग

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): मनुष्याच्या हातून सर्वाधिक चुका तेव्हाच होतात जेव्हा तो कोणत्या ना कोणत्या रुपाने प्रगतीपथावर असतो. तरुणपणात तरुणांच्या अंगी जोम असतो. हा जोम प्रगतीपथावर असतो. या वयात अनेक तरुण त्यांच्या अंगी असलेले सळसळते रक्त आणि जोश या मुळे त्यांचे भान हरपलेले असतात. या वयात असे तरुण कुणाचे काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतात. त्यामुळे अंगी जोश असलेले तरुण एक प्रकारे शरीराने प्रगतीपथावर असले तरी बुद्धीने अल्लड असतात. त्यामुळे या वयात तरुणांच्या हातून चुका घडतात. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा या तालुक्याच्या ठिकाणी एका तरुणाने दुस-या तरुणावर चाकूचे वार करत त्याला जखमी केले. या चाकू हल्ल्यात जखमी तरुण मरण पावला. केवळ जुन्या वादातून आपल्याकडे खुन्नसने बघतो या एकमेव कारणावरुन हा खूनाचा प्रकार घडला.

रोहीत गजानन लोणारी आणि हेमंत संजय सोनवणे हे दोघे तरुण पाचोरा शहरातील रहिवासी होते. दोघेही अवघे विस वर्षाचे होते. या वयात दोघांना साधी मिसरुढही फुटलेली नव्हती. कोवळ्या वयातील दोघा तरुणांमधे किरकोळ कारणावरुन धुसफुस सुरु होती. या वादातून हेमंत हा रोहीतकडे रागाने बघत असे. हेमंत आपल्याकडे रागाने बघतो हे रोहीतला आवडत नव्हते. त्यातून हेमंतला एके दिवशी बघूनच घेऊ असे रोहीत मनातल्या मनात म्हणत असे. त्याच्या मनातील हेमंतविषयीचा राग एके दिवशी प्रत्यक्षात आला आणि हिसंक घटना घडली.

19 फेब्रुवारी 2025 चा दिवस रात्री बारा नंतर सुरु झाला. छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीप्रमाणे या दिवशी जयंती होती. हा दिवस आपल्या जीवनातील अखेरचा दिवस असेल आणि या दिवसाची पहाट आपण बघणार नाही याची यत्किंचीतही कल्पना हेमंतला नव्हती. छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमीत्त पाचोरा शहरातील छ्त्रपती शिवाजी महाराज चौकात मध्यरात्री महाराजांच्या आरतीचे आयोजन करण्यात आले होते. त्याठिकाणी गल्लीतील तिघा मित्रांसह हेमंत सोनवणे हा गेला होता.

छ्त्रपती शिवाजी महाराजांची आरती आटोपल्यानंतर मध्यरात्री साडेबारा वाजता हेमंत त्याच्या तिघा मित्रांसह परत येत होता. त्याचवेळी वाटेत व्ही.पी. रोडवरील धोबी गल्ली नजीक असलेल्या बच्छाव किराणा दुकानाजवळ रोहीत लोणारी याने हेमंतची वाट अडवली. जुन्या वादातून रोहीतने हेमंत सोबत बाचाबाची करण्यास सुरुवात केली. आज तुला सोडत नाही असे म्हणत रोहीतने त्याच्या कमरेला असलेला चाकू बाहेर काढला.

हेमंतच्या पोटावर रोहीतने चाकूचे घाव घालण्यास सुरुवात केली. या चाकू हल्ल्यात हेमंत जखमी अवस्थेत जमीनीवर कोसळला. हेमंत जखमी अवस्थेत खाली पडताच रोहीत घटनास्थळावर पळून जाण्यात यशस्वी झाला. झालेला प्रकार बघून जमलेल्या लोकांनी त्याला तशाच अवस्थेत तातडीने नजीकच्या खासगी रुग्णालयात वैद्यकीय उपचारार्थ दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारार्थ त्याला लागलीच जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रवाना करण्यात आले. याठिकाणी वैद्यकीय अधिका-यांनी तपासणीअंती त्याला मयत घोषित केले.

Ranjit Patil ASI

या घटनेची माहिती मिळताच पाचोरा उप विभागीय अधिकारी धनंजय येरुळे यांच्यासह पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अशोक पवार यांनी आपले सहकारी सहायक फौजदार रणजीत पाटील, पोलिस उप निरीक्षक सोपान गोरे, हे.कॉ. राहुल शिंपी, पो.कॉ. योगेश पाटील आदींसह घटनास्थळ गाठत पुढील कारवाईला वेग दिला. या घटने प्रकरणी कमलाकर श्रावण महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पाचोरा पोलिस स्टेशनला संशयीत रोहीत गजानन लोणारी याच्या विरुद्ध रितसर गुन्हा दाखल करण्यात आला. अवघ्या दोन तासातच संशयीत रोहितला ताब्यात घेत अटक करण्यात आली.

जुन्या वादातून हेमंत आपल्याकडे खुन्नसने बघतो या कारणावरुन आपण त्याच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची कबुली रोहीतने पोलिसांना दिली. यात हेमंत सोनवणे ठार झाला. या हल्ल्यानंतर गुन्ह्यात वापरलेला चाकू रोहीतच्या एका मित्राने लपवून ठेवला होता अशी माहिती चौकशीसह तपासात पुढे आली. त्यामुळे त्याला देखील संशयीत आरोपी करण्यात आले तसेच त्याला अटक करण्यात आली. तसेच या गुन्ह्यात एका विधी संघर्षित बालकाचा देखील सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्याला ताब्यात घेत त्याची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली. या विधी संघर्षीत अल्पवयीन मुलाने संशयीत आरोपी रोहीतला चाकू आणून दिला होता अशी माहिती पुढे आली.

दरम्यान मयत हेमंत सोनवणे याच्या नातेवाईकांनी पाचोरा पोलिस स्टेशनवर धडक देत संशयीत आरोपीस आमच्या ताब्यात द्या, त्याला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली. सुमारे तासभर हा प्रकार सुरु होता. या जमावात महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. पोलिस अधिका-यांसह प्रमुख नागरिकांनी समजूत काढल्यानंतर जमावाने हेमंतचा मृतदेह ताब्यात घेत त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक पवार व त्यांचे सहकारी करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here