घाटंजी – यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या बदलीने रिक्त झालेल्या जागेवर जिल्हाधिकारी विकास मीना यांनी मंगळवार दि. 11 मार्च 2015 रोजी पदभार स्विकारला आहे. याप्रसंगी कार्यालयात प्रभारी जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी त्यांचे स्वागत करत त्यांना पदभार सोपवला.
विकास मीना हे सन 2018 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. यापुर्वी ते छत्रपती संभाजी नगर येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांनी त्या ठिकाणी अधिकारी कर्मचाऱ्यांना कामकाजात शिस्त लावणे, मुख्य प्रशासकीय इमारतीचे काम मार्गी लावणे, जल जीवन मिशन, विविध घरकुल योजना, स्वच्छ भारत मिशन या कामामध्ये मागे पडलेला जिल्हा राज्यात आणि विभागामध्ये देखील पहिल्या काही जिल्ह्यामध्ये आणण्याचे काम केले.
जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता, भौतिक सुविधा सुधारण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. नाशिक जिल्ह्यातील कळवण येथे कार्यरत असताना त्यांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय येथे प्रकल्प अधिकारी सोबतच उपविभागीय अधिकारी म्हणून देखील कार्य केले आहे.