जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): तमाशा प्रधान चित्रपट काळातील “पिंजरा” या चित्रपटातील शाळा मास्तरच्या भुमिकेला डॉ. श्रीराम लागू यांनी पुरेपुर न्याय दिला आहे. स्रीचे अंग बघून एखाद्या शिक्षकाची कशा प्रकारे नियत फिरते आणि त्याची बुद्धी कशा प्रकारे भ्रष्ट होते, तो शिक्षक कशाप्रकारे रसातळाला जातो हे या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. “पिंजरा” चित्रपटातील मास्तरच्या भुमीकेत डॉ. श्रीराम लागू यांनी स्वत:ला पुरेपूर झोकून दिल्याने त्यात ते यशस्वी झाले. आजच्या कलीयुगात काही शिक्षक कमी अधिक प्रमाणात बुद्धीने भ्रष्ट झाले आहेत असे नाईलाजाने म्हणावे लागते. काही शिक्षक छुप्या मार्गाने बाई, बाटली, सत्ता, खोटी प्रतिष्ठा आणि पैशाच्या नादी लागल्याचे चित्र देखील दिसून येते. या दुष्टचक्रात काही शिक्षक अडकतात आणि त्यात ते बरबटले जातात हे एक कटू सत्य आहे.

जळगाव जिल्ह्याच्या एरंडोल तालुक्यातील एका शाळेत मंगेश हरी पाटील हा विज्ञान विषय शिकवणारा शिक्षक कार्यरत होता. मंगेश पाटील या शिक्षकाने तो नोकरी करत असलेल्या शाळेतील एका विद्यार्थिनीवर अति प्रसंग करण्याचा प्रयत्न केला. कामवासनेने पछाडलेल्या या शिक्षकाच्या तावडीतून पिडीत विद्यार्थिनी कशीबशी निसटली. तिने तिच्या आईसह एरंडोल पोलिस स्टेशनला धाव घेत मंगेश पाटील या शिक्षकाविरुद्ध जवाब दिला. तिच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुदार मंगेश पाटील याच्या विरुद्ध गु.र.नं. 29/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 75, 75(2) सह बालकांचे लैंगीक अपराधापासुन संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 8, 10 प्रमाणे रितसर गुन्हा दाखल करण्यात आला. विद्या आणि सरस्वतीच्या वास्तूत विद्या दानाचे काम करणा-या शिक्षकाकडून पंधरा वर्षाच्या मुलीसमान विद्यार्थिनीसोबत केलेले गैर कृत्य निश्चितच निंदनीय आहे.
इयत्ता नववीच्या वर्गात शिक्षण घेणारी ती विद्यार्थिनी जवळपास पंधरा वर्षाची होती. नेहमीप्रमाणे ती विद्यार्थीनी 11 मार्च रोजी सकाळी सात वाजता शाळेत आली. शाळा सरु असतांना दहा वाजेच्या सुमारास तिला अन्य एका विद्यार्थीनीने “तुला मॅडमने स्टाफ रुममधे बोलावले आहे” असा निरोप दिला. निरोप मिळाल्यानंतर ती विद्यार्थिनी लागलीच स्टाफ रुममधे गेली. मात्र त्या ठिकाणी मॅडम ऐवजी विज्ञान विषयाचा शिक्षक मंगेश हरी पाटील हा एकटाच बसलेला होता.

ती विद्यार्थिनी स्टाफ रुममधे येताच मंगेश पाटील या शिक्षकाने तिला विचारले की, तु आणि तुझ्या मैत्रिणी शुक्रवारी शाळेत का आल्या नाहीत? त्यावर त्या निष्पाप विद्यार्थिनीने उत्तर दिले की आम्ही आलो होतो. निव्वळ काहीतरी निमीत्त करुन स्टाफ रुममधे त्या विद्यार्थीनीला बोलावणा-या विज्ञान विषयाच्या मंगेश पाटील या शिक्षकाने थेट तिच्याजवळ येऊन तिला हात पकडला. अचानक शिक्षकाने आपला हात पकडल्याचे बघून ती विद्यार्थिनी मनातून प्रचंड घाबरली. तिने आपला हात सोडवण्याचा पुरेपुर प्रयत्न केला. मात्र पुढच्याच क्षणी मंगेश पाटील या मास्तरने तिचे दोन्ही हात पकडून तिच्या दोन्ही गालांचे आणि ओठांचे चुंबन घेण्यास सुरुवात केली.

हा अनपेक्षीत प्रकार बघून ती विद्यार्थिनी अजूनच घाबरली. त्यामुळे ती पुर्ण ताकदीनिशी शिक्षकाच्या तावडीतून स्वत:ची सुटका करुन घेण्याचा प्रयत्न करु लागली. अगोदरचे गैरकृत्य कमी झाले म्हणून की काय मंगेश पाटील याने तिला जवळ ओढून घेत तिला मिठीच मारली. तो तिच्या छातीला व पाठीला अधाशासारखा स्पर्श करु लागला. मास्तर चेकाळल्याचे आणि आता पुढील गैरकृत्य अजूनच घाणेरडे होणार असल्याचे त्या विद्यार्थिनीच्या लक्षात आले. त्यामुळे तिने आता धाडसी होत थेट मास्तर मंगेश पाटील याची कॉलरच पकडली. आपला बचाव करण्यासाठी मंगेश पाटील या शिक्षकाची कॉलर पकडून तिने त्याला लांब ढकलले. मंगेश पाटील लांब ढकलला जाताच ती विद्यार्थीनी संधी साधून घाबरलेल्या अवस्थेत वर्गात पळून आली.
घाबरलेली आपली सहकारी वर्ग मैत्रीण बघून तिच्या मैत्रीणी तिच्या जवळ आल्या. त्यांनी सामुहिकपणे तिला रडण्याचे कारण विचारले.
रडत रडत त्या विद्यार्थिनीने तिच्या वर्ग मैत्रीणींना घडलेला प्रकार कथन केला. त्या सरवनी तिला धाडस आणि धीर देत दोघा महिला शिक्षिकांकडे नेले. त्या दोघा महिला शिक्षिकांनी आपल्या सहकारी शिक्षकांचे कारनामे पिडीत विद्यार्थीनीसह तिच्या मैत्रीणींकडून समजून घेतले.
त्या दोघा महिला शिक्षीकांनी सर्व प्रकार इतर शिक्षकांसह थेट मुख्याध्यापकांच्या कानावर घातला. अशा प्रकारे मंगेश पाटील या शिक्षकाची काळी बाजू सर्व शाळेत पसरली. मुख्याध्यापकांनी तिला धीर देत तिची समजूत घालून दुस-या दिवशी पालकांना सोबत घेऊन येण्यास सांगितले. मनातून घाबरलेली ती विद्यार्थिनी त्या दिवशी धास्तावलेल्या अवस्थेत कशीबशी घरी गेली. तिने शाळेत घडलेला सर्व प्रकार तीच्या आई वडीलांच्या कानावर घातला.
नराधम शिक्षकाला कठोर शिक्षा आणि आपणास न्याय मिळावा यासाठी दोघा मायलेकींनी एरंडोल पोलिस स्टेशन गाठले. पोलिस निरीक्षक निलेश गायकवाड यांची भेट घेत त्यांनी शाळेत घडलेला प्रकार त्यांच्या कानावर टाकला. पिडितेच्या मनातील भिती आणि तिच्या आईच्या मनातील राग पोलिस निरीक्षक निलेश गायकवाड यांनी समजून घेतला. दोघी मायलेकींची व्यथा त्यांनी शांतपणे ऐकून घेतली. या घटने प्रकरणी पिडीत विद्यार्थिनीच्या आईची फिर्याद घेण्यात आली. गु.र.नं. 29/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 75, 75(2) सह बालकांचे लैंगीक अपराधापासुन संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 8, 10 प्रमाणे दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शंकर लक्ष्मण गायकवाड यांच्याकडे सोपवण्यात आला.


दरम्यान आपल्याविरुद्ध गुन्हा दाखल होत असल्याची कुणकुण लागताच मंगेश पाटील हा शिक्षक फरार होण्यात यशस्वी झाला. तो रहात असलेल्या पाचोरा या गावी पोलिस पथक गेले. मात्र तो रहात असलेल्या जागी मिळून आला नाही. दरम्यान तांत्रीक विश्लेषणाचा आधार घेत त्याच्या मोबाईलचे लोकेशन घेण्यात आले. मात्र मंगेश पाटील हा त्याच्या ताब्यातील मोबाईल स्विच ऑफ करुन पसार झाला होता. त्यामुळे तांत्रीक विश्लेषणासह गुप्त बातमीदारांचे देखील सहकार्य घेण्यात आले. पळून गेलेल्या शिक्षकाची पत्नी, मुले व नातेवाईक पोलिसांना सहकार्य करत नसल्याचे पोलिस तपास पथकाच्या लक्षात आले. मात्र तरीदेखील पोलिस पथक आपल्या परीने तपास करत होते. पोलिस नियंत्रण कक्षातील महिला पोलिस उप निरीक्षिका शुभांगी पाटील यांच्या समक्ष पिडीत विद्यार्थिनीचा जवाब घेण्यात आला.




तपासा दरम्यान पळून गेलेला शिक्षक मंगेश पाटील हा छ्त्रपती संभाजीनगर येथे असल्याची शक्यता पोलिस पथकाच्या लक्षात आली. गोपनीय बातमीदारांकडून देखील पोलिस पथकाला तशी माहिती समजली. त्या शक्यतेच्या आणि माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार राजेश पंडीत पाटील, पो.हे.कॉ. महेंद्रसिंग पाटील, पो.हे.कॉ. लक्ष्मण पाटील, पो.कॉ. भुषण पाटील आदींचे पथक छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने रवाना झाले. स्थानिक सातारा पोलिस स्टेशनची मदत घेत एरंडोल पोलिस स्टेशनच्या पथकाने पुढील कारवाईला सुरुवात केली.




फरार मंगेश पाटील याचा माग काढत काढत छ्त्रपती संभाजी नगर येथील सातारा पोलिस स्टेशन आणि एरंडोल पोलिस स्टेशनच्या संयुक्त पथकाने सिडको बस स्थानक गाठले. या बस स्थानकाला पोलिस पथकाने गुप्त विळखा घातला. फरार मंगेश पाटील हा जालना जिल्ह्यातील अंबड येथे पळून जाण्याच्या बेतात असतांनाच पोलिस पथकाने त्याच्यावर झडप घातली. त्याला जेरबंद करण्यात आले.
फरार शिक्षक मंगेश पाटील यास पोलिस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या समक्ष हजर करण्यात आले. मंगेश पाटील पोलिसांच्या तावडीत सापडल्यानंतर देखील त्याच्या वर्तणुकीत बदल झाला नसल्याचे पोलिसांना जाणवले. शिक्षक असूनही तो एखाद्या सराईत गुन्हेगाराप्रमाणे पोलिसांसोबत वागत होता. तुम्ही जर मला छ्त्रपती संभाजीनगर येथे पकडले नसते तर मी तुमच्या हाती कधीच लागलो नसतो असे उद्धट उत्तर तो देत होता. एक शिक्षक असूनही त्याने शाळेतील विद्यार्थीनीसोबत अश्लिल कृत्य केले होते. तसेच त्याची पोलिस पथकासोबत वागण्याची व तपासकामी सहकार्य न करण्याची भुमिका आणि पद्धत बघता तो समाजाला घातक असल्याचे दिसून आले. त्याला सामाजिक भान आणि सामाजिक जाणीव नसल्याचे एकंदरीत दिसून आले. शिक्षक असूनही कायद्याचा जो धाक सामान्य व्यक्तीच्या मनात असतो तो त्याच्या अंगी दिसून येत नव्हता. लहान मुलीचा लैंगिक छ्ळ केल्याचा गंभीर गुन्हा त्याने विद्येच्या दालनात आणी वास्तूत केला. त्यामुळे त्याची सखोल चौकशी व तपास पोलिसांनी करुन त्याला कडक शासन व्हावे अशी सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे.
न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सुरुवातीला त्याला पोलिस कोठडी व नंतर न्यायालयीन कोठडी सुनावली. पिडीत विद्यार्थिनीस बाल कल्याण समिती अध्यक्षांसमक्ष हजर करुन तिचे समुपदेशन करण्यात आले. त्यानंतर तिला तिच्या आई वडीलांच्या स्वाधिन करण्यात आले. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शंकर पवार व त्यांचे सहकारी स.पो.नि. गणेश पाटील, सहायक फौजदार राजेश पाटील, हे.कॉ. अनिल पाटील, महेंद्रसिंग पाटील, पोलिस नाईक मिलींद कुमावत, सचिन पाटील, संदिप पाटील, पो.कॉ. प्रशांत पाटील, चालक भाऊसाहेब मिस्तरी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे हे.कॉ. लक्ष्मण पाटील, पो.कॉ. भुषण पाटील, जितु पाटील आदींनी या तपासकामी सहभाग घेतला.